Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हरयाणातील 90 पैकी 84 नवनिर्वाचित आमदार कोट्यधीश
ऐक्य समूह
Saturday, October 26, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: na1
5चंदीगड, दि. 25 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. हरयाणा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले 90 पैकी 84 आमदार हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ अर्थात ‘एडीआर’ या संस्थेच्या   अहवालात ही माहिती उघड झाली आहे. मावळत्या विधानसभेत 90 पैकी 75 आमदारांची संपत्ती एक कोटी रुपयांहून अधिक होती. याचा अर्थ कोट्यधीश आमदारांच्या संख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एडीआरच्या अहवालानुसार हरयाणामध्ये सध्याच्या आमदारांची संपत्ती सरासरी 18.29 कोटी रुपये आहे. 2014 मध्ये आमदारांची संपत्ती सरासरी 12.97 कोटी रुपये होती. भाजपचे 40 पैकी 37 आमदार आणि काँग्रेसचे 31 पैकी 29 आमदार कोट्यधीश आहेत. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) 10 आमदार सर्वात श्रीमंत आहेत. त्यांची सरासरी संपत्ती 25.26 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 57 आमदारांचे वय 41 ते 50 वर्षे आहे.  62 आमदारांचे शिक्षण पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत झाले आहे. अहवालातील आकडेवारीनुसार 90 पैकी 12 आमदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत तर मावळत्या विधानसभेतील 9 आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यात काँग्रेस, भाजप आणि जेजेपीच्या आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, ‘अब की बार पचाहत्तर पार’ अशी घोषणा देऊन हरयाणा विधानसभा निवडणुकीत 90 पैकी 75 जागा जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने उतरलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला गुरुवारी अनपेक्षित पराभवाचा जोरदार झटका बसला. विधानसभेतील 75 जागा जिंकणे तर दूरच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला गेल्या वेळी मिळविलेले पूर्ण बहुमतही टिकवता आले नाही. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एक्झिट पोलच्या भाकितांसह सर्वांचे आडाखे चुकवत दमदार लढत देत भाजपची पार दमछाक केली. काँग्रेसने भाजपला 40 जागांवर रोखून सत्तेसाठी अपक्ष आमदारांसोबत जोडतोड करण्यास भाग पाडले आहे. अतिशय दोलायमान आणि चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपने 40, काँग्रेसने 31, दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने 10 जागा जिंकल्या. सात अपक्ष आणि हरयाणा लोकहित पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: