Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीर आणि लडाख आजपासून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश
ऐक्य समूह
Thursday, October 31, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहेत. गुरुवार, दि.31 ऑक्टोबरपासून हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश कार्यरत होतील. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी हे नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येत आहेत.
सनदी अधिकारी गिरीश चंद्र मुरमू आणि आर. के. माथुर यांची अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रपती भवनातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. मुरमू हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत तर माथुर केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. गिरीशचंद्र मुरमू हे 1985 च्या तुकडीचे गुजरात श्रेणीचे सनदी अधिकारी असून  ते केंद्रीय अर्थमंत्रालयात सचिव (खर्च) आहेत तर आर. के. माथुर हे 1977 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असून त्यांनी संरक्षण सचिव आणि माजी मुख्य माहिती आयुक्त ही पदे भूषविली आहेत.  जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार असून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट रोजी अनुच्छेद 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: