Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीच्या नूतन आमदारांसह प्रमुख पदाधिकार्‍यांची 3 नोव्हेंबरला मुंबईत बैठक
ऐक्य समूह
Friday, November 01, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: lo2
शपथविधीनंतर शरद पवार सातार्‍यामध्ये येणार
5सातारा, दि. 31 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातार्‍यात घेतलेली सांगता सभा. भर पावसात या सभेस जिल्हावासीयांना लावलेली उपस्थिती. शरद पवार यांच्या आवाहनाला मतदारांनी दिलेला प्रतिसाद पाहता शरद पवार यांच्या सूचनेप्रमाणे होणार्‍या आभार दौर्‍याची सातारकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. साधारण मंत्रिमंडळ शपथविधीनंतर हा दौरा होण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिले आहेत. निकालानंतर राज्यातील घडामोडींचा आढावा घेणारी बैठक शरद पवारांनी 3 नोव्हेंबर रोजी मुंबईला बोलावली असून राष्ट्रवादीच्या नूतन आमदारांसह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी या बैठकीला रवाना होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आचार आणि विचारांचा वारसा असणार्‍या साताराजिल्ह्यावर गेल्या दोन दशकांपासून शरद पवार यांची राजकीय पकड आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा तर श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शरद पवार व्यथित झाले होते. उदयनराजे भोसले यांना दिलेली संधी ही आपली चूक होती. ती तुम्ही दुरुस्त करा हे भावनिक आवाहन शरद पवार यांनी सातार्‍यात भर पावसातल्या सभेत केले होते. सातारकरांनी या आवाहनाला प्रतिसाद देत उदयनराजे यांना नाकारून पवारांचे विश्‍वासू साथीदार श्रीनिवास पाटील यांना लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी केले. सातारकरांनी घडवलेल्या या परिवर्तनाची दखल घेत शरद पवार यांनी सातार्‍यात येऊन सातारकरांचे आभार मानण्याची इच्छा प्रकट केली होती. नूतन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या भेटीनिमित्त पवारांचा सातार्‍याच्या दौर्‍याचा योग जुळत आला होता. मात्र, राजकीय कार्यक्रमाची व्यस्तता यामुळे पवारांनी श्रीनिवास पाटील यांना बारामतीतच बोलावून घेतले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव हा देखील शरद पवार यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे पवारांचा सातारा दौरा लांबणीवर पडला. तसा सातारा दौरा पवारांना नवीन नाही आणि पवार सातार्‍याला चांगलेच परिचित आहेत. या जिल्ह्याची बदलणारी राजकीय कूस शरद पवार यांना बरोबर कळते आणि तो बदल पवारांनी सातारकर मतदारांच्या माध्यमातून घडवत महायुतीच्या सातार्‍यातील राजकीय समीकरणांना जोरदार झटका दिला.
पवारांचा सातारा दौरा घडावा असा कार्यकर्त्यांचाच नव्हे तर मतदारांचा सुद्धा आग्रह होत आहे. या आग्रहाची दखल शरद पवार यांनी घेतली असून त्यांच्या वेळापत्रकात या दौर्‍याची नोंद झाली आहे. कदाचित हा दौरा मंत्रिमंडळ रचनेनंतर होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. पक्षाची पुढील वाटचाल, आगामी जिल्हा परिषद आरक्षण सोडती, ग्रामपंचायत निवडणुका या दृष्टीने शरद पवार यांनी सातारा जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व नूतन आमदार यांची बैठक 3 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बोलावली आहे. या बैठकीला शशिकांत शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: