Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक
ऐक्य समूह
Saturday, November 02, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 1 : कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरूणाची चार लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अशरफ नसरूद्दिन हकीम, रा. शनिवार पेठ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हकीम यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफ हकीम त्यांच्या मोबाईलवर युट्युबवर व्हिडीओ पाहताना त्यांना बजाज फिन सर्व’ अशी एक जाहिरात दिसली. त्यावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी फोन करून व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने पाच लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली. त्यावेळी समोरून बोलणार्‍याने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत हकीम यांना 25 हजार रुपये शुल्क म्हणून बँक खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानंतर संशयिताने तुम्हाला अधिक कर्ज पाहिजे असल्यास मिळेल, असे सांगितल्याने हकीम यांनी अजून पाच लाखांची मागणी केली. त्यावर संबंधिताने या नव्या पाच लाखाचे शुल्क म्हणून पुन्हा 25 हजार बँक खात्यावर भरण्यास सांगितल्याने हकीम यांनी 25 हजार बँक खात्यावर भरले. त्यानंतर काही दिवसांनी संबंधितांनी तुम्हाला कर्ज मंजूर झाले असून त्या कर्ज रकमेचा टॅक्स म्हणून एक लाख 80 हजार भरण्यास सांगितल्याने हकीम यांनी तेही पैसे संशयिताच्या बँक खात्यावर भरले. त्यानंतर एक आठवड्याने तुमचे कर्ज आज सोडायचे असल्याने अनामत रक्कम म्हणून तुम्हाला आमच्याकडे एक लाख 80 हजार रुपये ठेवावे लागतील. ते पैसे तुम्हाला कर्जाच्या परतफेडीनंतर परत दिले जातील, असे सांगण्यात आल्याने हकीम यांनी पुन्हा एक लाख 80 हजार बँक खात्यावर भरले.    
मात्र, त्यानंतर संशयितांनी हकीम यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केल्याने आपली वेळोवेळी भरलेले एकूण चार लाख दहा हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हकीम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: