Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
झारखंड विधानसभेची निवडणूक पाच टप्प्यात, निकाल 23 डिसेंबरला
ऐक्य समूह
Saturday, November 02, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 1 : झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या ठिकाणी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, 7 डिसेंबर रोजी दुसर्‍या, 12 डिसेंबर रोजी तिसर्‍या, 16 डिसेंबर रोजी चौथ्या आणि 20 डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे  मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी  जाहीर केले.
येत्या 5 जानेवारी रोजी झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या पाच उपायुक्तांनी 17-18 ऑक्टोबर रोजी झारखंडचा दौरा केला होता. झारखंडमध्ये एकूण 19 जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील 67 मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत.
घरी बसून मतदान
झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.
41 जागांसाठी बहुमत
झारखंड विधानसभेची संख्या 81 असून राजकीय पक्षांना बहुमतासाठी 41 चा आकडा पार करावा लागणार आहे. सध्या झारखंडमध्ये भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनची सत्ता आहे. मात्र यावेळी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 37 जागा मिळाल्या होत्या तर एजेएसयूला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: