Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अर्धा किलो सोने घेवून परप्रांतीयांचे पलायन 15 लाखाला गंडा; शोधपथके रवाना
ऐक्य समूह
Saturday, November 02, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 1 : फलटण येथील सराफास लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या बंगालमधील कामगाराची घटना काही महिन्यापूर्वी घडली असतानाच आता सातार्‍यातील एका सराफास बिहारमधील दोन कामगारांनी सोन्याचे दागिने तयार करुन देण्यासाठी घेतलेले 15 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने घेवून पोबारा केल्याची घटना घडली. यामुळे सराफी बाजारात एकच खळबळ माजली असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व शाहूपुरी गुन्हे प्रकटन शाखेचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश रमेश घोडके, रा. कोटेश्‍वर मैदानानजीक, सातारा यांचे येथील शनिवार पेठेत गेल्या 40 वर्षांपासून ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या वर्षी निसार शेख खान व प्रभुदेवा दोघेही राहणार मिरपूर (उत्तर प्रदेश) नावाचे दोन कामगार त्यांच्या संपर्कात आले.
सोन्याचे दागिने बनवून घेण्याचे काम घोडके त्यांच्याकडून करुन घेत होते. वर्षभरात या जोडगोळीने घोडके यांच्या सराफबाजारातील इतर काही व्यापार्‍यांचा विश्‍वास संपादन केला होता. मात्र, शुक्रवारी या परप्रांतिय कामगारांनी व्यापार्‍याच्या विश्‍वासाला तडा दिला. त्यामुळे परप्रांतिय कारागिरांकडे काम देण्यापूर्वी त्यांची खातरजमा करुन घेणे
आवश्यक आहे.
शुक्रवारी घोडके नेहमीप्रमाणे दुकानात आले. आज दुपारी 12.30 वाजता त्यांनी निसार खान व प्रभुदेवा यांच्याकडे अर्धा किलो सोने दागिने बनवण्यासाठी दिलेे होते. दुपारच्या सुमारास निसार शेख याने घरी सिलेंडर गॅस आणण्याचा बहाणा करत घोडके यांना खोलीवर जातो असे सांगून निघून गेला. तर प्रभुदेवा हा देखील काही वेळात पोटात दुखत असल्याचे सांगत खोलीवर जातो असे सांगून निघून गेला. सायंकाळपर्यंत हे दोघेही परत न आल्याने घोडके हे त्यांच्या खोलीवर गेले असता ते परप्रांतिय ज्या खोलीमध्ये काम करत होते तेथून अर्धा किलो सोने लंपास असल्याचे आढळून आले. उमेश घोडके यांनी परिसरामध्ये त्यांची चौकशी केली असता ते कोठेही आढळून आले नाहीत.
घोडके यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते स्वीचऑफ लागल्याने मग त्यांचे धाबे दणाणले. सायंकाळी घोडके यांनी थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत निसार शेख खान व प्रभुदेवा यांच्याविरुध्द ते 15 लाख रुपयांचे अर्धा किलो सोने घेवून पळून गेले असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही परप्रांतिय कामगारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ते दोघे मिरपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार हसन तडवी करत आहेत.
दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांचे कर्मचारी असलेले संयुक्त पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: