Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुरक्षा वाढवण्याची मुस्लिमांची मागणी
ऐक्य समूह
Monday, November 04, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचा अंतिम निर्णय येण्यापूर्वी अयोध्येत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी मुस्लीम समाजाने केली आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादप्रकरणावरच्या निकालापूर्वी मुस्लीम समाजाने प्रशासनाकडे केंद्रीय अर्थ सैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अयोध्येत ज्या भागात मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या भागात सुरक्षा तैनात करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
फैजाबाद प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत मुस्लीम समाजाने ही मागणी केली आहे. जमियत उलेमा हिंदच्या अयोध्या विंगच्या जनरल सेक्रेटरी हाफीज इरफान यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणाले, आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्‍वास आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परिसरात शांतता व सद्भावना कायम राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु, जर निकाला आधी मुस्लीम बहुल भागात केंद्रीय अर्ध सैनिक दल तैनात केले तर आम्हाला अधिक सुरक्षित वाटेल. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. तसेच या महिन्यात यासंबंधीचा निर्णय येण्याची शक्यता आहे.
फैजाबादच्या पोलीस अधीक्षकांनी मुस्लीम समाजाला पुरेसी सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचा विश्‍वास दिला आहे. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या भागात आधीपासूनच पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरी पोलिसांसोबत सीआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आशीष तिवारी यांनी दिली. अयोध्येत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असे आश्‍वासन फैजाबादच्या जिल्हाधिकार्‍यांनी मुस्लीम समाजाला दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना कोणतेही भाष्य करू नका, असे आवाहन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्र्यांनी कोणतेही वक्तव्य करू नये, असे योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट बैठकीत सांगितले. कोणताही वाद निर्माण होईल, असे कोणतेही वक्तव्य मंत्र्यांनी करण्याचे टाळावे, असे ते म्हणाले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: