Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आदिवासी महिलाही म्हणाली, मोदींना हटवा
ऐक्य समूह
Monday, November 04, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: mn5
5मुंबई, दि. 3 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मी नाशिकच्या दौर्‍यावर गेलो असता, मोदींना हटवा असे एक आदिवासी महिला मला म्हणाली. हा असंतोष लोकांच्या मनात आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये झुंज देऊन अपयशी ठरलेल्या उमेदवारांशी संवाद साधला.
‘अनेकांना निवडणुकीत यश आले नाही. त्याला बरीच कारणे आहेत. आपली साधनसामग्री कमी पडली. सत्ताधार्‍यांकडे दिल्ली व राज्याची जबरदस्त ताकद होती. त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. जे जिंकले त्यांनी आवाक्याबाहेर मेहनत केली आणि विजय मिळवला,’ असे शरद पवार यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने लढले. निवडणुकीच्या काळात तरूण पिढीची साथ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळाली. अल्पसंख्याक समाजानेही आपल्याला साथ दिली. काही झाले तरी भाजपला निवडून आणायचे नाही, अशी मनस्थिती होती. अनेकांनी ‘वंचित’ने नुकसान केल्याचे सांगितले. समाजातील गरीब वर्ग ‘वंचित’च्या माध्यमातून संघटित झाला आहे. आंबेडकरांना मानणारा हा वर्ग आहे. आतापर्यंत हा वर्ग आपल्या सोबतच होता. काही कारणाने हा समाज आपल्यापासून दुरावला गेला. हा समाज आपल्यासोबत कसा येईल त्यासाठी आपल्याला काम करावे लागेल, असे त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितले.
संपूर्ण राज्यात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी आपण त्यांना धीर देण्यासाठी बांधावर गेले पाहिजे. मी नाशिकला गेलो तेव्हा एक आदिवासी महिला म्हणाली, आधी मोदींना हटवा. हा असंतोष लोकांच्या मनात आहे. त्यांना विश्‍वास आहे, की आपणच ही परिस्थिती हाताळू शकतो. काही ठिकाणी संघटनात्मक कामात आपण कमी पडलो. शहरांमध्ये आपल्या जागा कमी आल्या.
एकेकाळी शहरांमध्ये आपली ताकद होती. निवडणुकीत यश आले नाही, तरी तुमच्यावर येत्या काळात महत्त्वाची जबाबदारी टाकली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तुम्हाला जनतेच्या मनात रूजवायचे आहेत, असेही त्यांनी नेते आणि पदाधिकार्‍यांना सांगितले.
अजित पवारांना आला संजय राऊतांचा एसएमएस!
केंद्रात सक्रिय असणारी एखादी व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात यापूर्वी असे झाले आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत.’ अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आलेले असतानाच दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यानच अजित पवार यांना एक एसएमएस पाठवून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने महाआघाडीला दिलेला आहे. समोरच्यांनी सरकार स्थापन करावे याची आम्ही वाट पाहतोय, असेही अजित पवार म्हणाले. संजय राऊत यांनी निवडणुकांनंतर प्रथमच एसएमएस केला आहे, आपण त्याचे उत्तर देऊ, असे विधान त्यांनी केले. या एसएमएसमध्ये संजय राऊत यांनी केवळ ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले होते, असेही पवार यांनी सांगितले. शरद पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे, ती शक्यता मात्र अजित पवार यांनी फेटाळली आहे. शरद पवार मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवारांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्याही आमदारांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच काठावरच्या नेत्यांना इशाराही दिला. ते म्हणाले, ‘ज्या कुणाला पक्ष सोडून जायचा असेल त्यांनी आताच जावे.’ जे लोक पक्ष सोडून गेले त्यांचे ‘येऊ का येऊ का’ सुरू असेल असेही त्यांनी सांगितले.
नव्या दमाच्या तरुणांना संधी द्या
पराभव झाला म्हणजे सगळे संपले असे समजण्याचे अजिबात कारण नाही. जे नवे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी कामाला लागा. विधानसभेत विदर्भाने चांगला कौल दिला, पण जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे आपल्याला चांगले काम करावे लागणार आहे, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या होतकरूंना, कार्यकर्त्यांना केले. लोकांशी संपर्क ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: