Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तीस हजारी न्यायालयातील राड्याची चौकशी एसआयटीकडे
ऐक्य समूह
Monday, November 04, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या परिसरात शनिवारी (दि.3) पार्किंगच्या वादातून पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या राड्याच्या व गोळीबाराची चौकशी विशेष तपास पथकाकडून केली जाणार आहे. गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे.  दरम्यान, या धुमश्‍चक्रीनंतर दिल्ली बार असोसिएशनने सोमवारी दिल्लीतील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये एक दिवसांचा संप पुकारला आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
पार्किंगच्या वादावरुन तीस हजारी कोर्टाच्या परिसरात वकील आणि पोलिसांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी एका वकिलाला जबर मारहाण केली व गोळीबार केला असा आरोप वकिलांनी केला असून त्यानंतरच हिंसक वळण लागले. पोलिसांच्या गोळीबारामुळे एक वकील गंभीर जखमी झाल्याने, संतप्त झालेल्या वकिलांनी पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना मारहाण देखील केल्याचे सांगितले जात आहे.   
वकिलास मारहाण आणि गोळीबाराच्या घटनेने कोर्टाच्या आवारात प्रचंड तणाव निर्माण झाला. भडकलेल्या वकिलांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करीत आगी लावल्या. यामध्ये 20 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती असून जखमींमध्ये वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे. यावेळी काही माध्यम प्रतिनिधींना देखील मारहाण झाल्याचे वृत्त आहे.
कोर्टाच्या आवारात राडा भडकल्याने येथे तणाव वाढला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालय परिसराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस दलास पाचारण केल्याने सध्या कोर्टाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: