Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा निर्घृण खून
ऐक्य समूह
Monday, November 04, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: re1
पतीस अटक : येवती येथील घटना
5कराड, दि. 3 ः येवती, ता. कराड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संदीप शहाजी थोरात (वय 29 वर्षे), रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा यांनी दिली असून या प्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. रेखा विनोद कांबळे (वय 35 वर्षे), रा. येवती, ता. कराड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विनोद रामचंद्र कांबळे (रा. येवती, ता. कराड) असे खून प्रकरणी अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी संदीप थोरात याची बहीण रेखा हिचे सन 1999 साली विनोद कांबळे याचेशी लग्न झाले होते.   
तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. गेल्या एक वर्षापासून विनोद हा दारू पिऊन येऊन चारित्र्याच्या संशयावरून रेखाला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. गेल्या सहा महिन्याचे आसपास रेखा हिची सासू अनुसया कांबळे यांना कराड येथे अ‍ॅडमीट केले होते. त्यानंतर दुसरे दिवशी विनोद याने रेखाचा दुसरा भाऊ अजित यास फोन करून कराडला बोलावले. त्यावेळी रेखाचा भाऊ संदीप तेथे पोहचला. त्यानंतर विनोद याने रेखा ही हॉस्पिटलमध्ये रात्री परपुरूषा शेजारी बसून बोलत होती, असे सांगून तिच्यावर संशय व्यक्त केला. त्यावेळी संदीप तिला माहेरी घेऊन गेला. त्यानंतर काही दिवसांनी विनोद हा रेखाला घेऊन येवती येथे आला. त्यानंतर रेखाचा मुलगा रोहित याने विनोद हा रेखास संशयावरून शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत असल्याचे रेखाच्या भावास सांगितले. त्यावेळी रेखा हिने पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर शनिवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संदीप हा मजुरीकामी असताना त्याचे मामा लक्ष्मण दरागडे यांनी फोन करून रेखा हिचे डोक्यात तिच्या नवर्‍याने कुर्‍हाड मारली आहे व तिला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीपचे सर्व नातेवाईक हॉस्पिटलला येऊन पाहिले असता रेखा आय.सी.यु.मध्ये बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या डोक्यावर मध्यभागी गंभीर जखम झाली होती. त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी रेखा ही मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी रेखाचा पती विनोद कांबळे यास ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर करत आहेत.
    
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: