Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिहारमध्ये छठ पूजेवेळी चेंगराचेंगरी; 4 जणांचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, November 04, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: na1
5पाटणा, दि. 3 (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये छठ पूजा सुरू असताना झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन चिमुरड्यांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील औरंगाबादेत झालेल्या चेंगराचेंगरीत दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर समस्तीपूर जिल्ह्यातील घाटाजवळ मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
बिहारच्या औरंगाबादमध्ये शनिवारी छठ पूजेवेळी घाटावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला  तर अनेक जण जखमी झाले आहेत.   
जखमी झालेल्या लोकांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मृत्यूमुखी पडलेल्यांत पाटणाच्या बिहटा या गावचा रहिवासी असलेला सहा वर्षीय मुलगा आहे. तर भोजपूर येथील 18 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सूर्याकुंड येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि पोलीस अधीक्षक दीपक बर्णवाल यांनी मृत मुलांच्या कुटंबीयांची भेट घेतली. छठ पूजेवेळी खूप गर्दी झाल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.
मृतांच्या नातेवाईकांना लवकर आर्थिक मदत जाहीर केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तर राज्यातील समस्तीपूरमध्ये झालेल्या अन्य एका घटनेत छठ पूजा घाटावर मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य काही जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: