Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आनेवाडी, खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर होणारी अन्यायकारक पथकर वसुली बंद करा
ऐक्य समूह
Wednesday, November 06, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 :  सातारा-पुणे रस्ता पूर्णत: खड्डेमय, नष्ट झालेला असताना व कोणत्याही सोयीसुविधा नसताना आनेवाडी आणि खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर होत असलेली जबरदस्ती तसेच अन्यायकारक पथकर वसुली त्वरित बंद करण्यात यावी. प्रस्तुत सूचना मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत सातारा-पुणे रस्ता हा पूर्णपणे त्रुटीमुक्त करण्यात यावा. तोपर्यंत पथकर वसुली बंद करण्यात यावी अन्यथा हा विषय न्यायालयासमोर आणला जाईल तसेच आपल्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात येईल, असा इशारा टोलविरोधी सातारकर जनतेने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंगल यांना एका निवेदनाद्वारे दिला. या निवेदनाच्या प्रती नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितिन गडकरी यांना पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सातारकर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 यावरून प्रवास करणारे सर्व प्रवासी आणि जनसमुदाय हे या रस्त्याने नियमित ये-जा करीत असतात. या मार्गावर असलेला खेड-शिवापूर आणि आनेवाडी येथील पथकर वसुलीबाबत आमचा आक्षेप आहे. आपण संदर्भहीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर चौपदरीकरणाचा पश्‍चात पथकर आकारणी सुरू केली तेव्हापासून ते आजपर्यंत हा रस्ता पथकर आकारण्यास कोणत्याही अनुषंगाने सक्षम नव्हता आणि नाही. आपण जो पथकर आकारता त्या बदल्यात आवश्यक सोयीसुविधा म्हणजेच उत्तम सेवा, रस्ते, प्रसाधनगृहे,  दर्जेदार मुख्य रस्ता, रुग्णवाहिका, रस्त्याच्या बाजूस परावर्तक, पांढरे पट्टे, पिवळे पट्टे, पथदिवे आणि त्याची वेळोवेळी देखभाल यांची सुविधा कधीही पुरवली जात नव्हती. या मार्गावर असणारे अनेक उड्डाणपूल हे अर्धवट स्थितीत असून ठिकठिकाणी रस्ते वळविण्यात आले आहेत. मुख्य रस्त्याचे तर अस्तित्वही राहिले नाही. सदर रस्ता हा केवळ असंख्य खड्ड्यांच्या साम्राज्यात बुडाला आहे. तो डांबरी रस्ता न राहता, कच्चा रस्ता झाला आहे. जगात कोठेही कच्च्या रस्त्याला पथकर लागू नाही. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कित्येकांनी तर या रस्त्यावर गंभीर अपघातात आपला जीव गमावला आहे. वास्तविक परिस्थिती पाहता आपल्याला सदर मार्गावर पथकर आकारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसताना तुम्ही पथकर आकारणी स्वतः अथवा त्यासाठी अभिकर्ते नेमून करीत आहात. प्रत्येक जण स्वतःच्या व्यापात बुडालेला असतो अथवा त्याच्याकडे याबाबत पुरेसा मागोवा घेण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ नसल्याने किंवा त्याबाबत माहिती नसल्याने विषय अधांतरी सोडून दिला जात असतो. नेमक्या याच अडचणींचा तुम्ही लाभ घेऊन लूट करीत आहात. भारतासारख्या लोकशाही देशात उघडपणे चालणारी ही वाटमारी असून सामान्य माणूस तक्रार करण्यास कचरत असतो. या वास्तव सदरकामी केंद्र व राज्य शासन स्तरावरील अत्यंत बेजबाबदार हाताळणीमुळे या मार्गावर प्रवास करणार्‍या जनतेला अनेकांगी आर्थिक आणि जीवित नुकसान सोसावे लागत आहे, अशी आम्हा जनतेची धारणा झाली आहे. त्यामुळे आपण समुचित आदेश निर्गमित करुन हा मार्ग त्रुटीमुक्त होईपर्यंत या मार्गावरील पथकर व पथकर वसुली बंद करावी. अन्यथा हा विषय न्यायालयासमोर आणला जाईल तसेच आपल्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात येईल. या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, अप्पर सचिव मुख्यमंत्री कार्यालय आदींना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर रवींद्र नलावडे, महेश माने, योगेश माने, चेतन पवार, सुभाष जाधव, राजू जाधव, संदीप राक्षे, महेश पवार, कुलदीप मोहिते आदींसह असंख्य सातारकरांच्या सह्या आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: