Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवसेनेने निर्णय घ्यावा, राष्ट्रवादी तयार ः मलिक
ऐक्य समूह
Wednesday, November 06, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) : सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेत द्वंद्व पेटले असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली आहे. पण ‘राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ‘शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ शकतो’, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार मुंबईत आपल्या सहकार्‍यांसोबत चर्चा करून ते उद्या किंवा परवा सोनिया गांधींची पुन्हा दिल्लीत भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याने राज्यातील सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षातील वाद वाढत चालला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सतत भाजपवर हल्ला करत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी आशा व्यक्त केली. पण त्यांनी शिवसेना किंवा युतीचा उल्लेख न केल्याने राज्यातील राजकीय अस्थिरता कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली आहे. पण शिवसेनेने ठरवले तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्याला पर्यायी सरकार देऊ शकते तसेच आम्ही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही, शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत बसून मार्ग काढू. शिवसेनेने निर्णय घेतल्यास आम्ही पर्यायी सरकार
 देऊ शकतो, असे नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेतली. भाजप-शिवसेनेमधील मतभेद अतिशय गंभीर असून ते कधी आणि कसे संपतील, हे सांगता येत नसल्याचे  पवार यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर सांगितले. शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडणार असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थनाचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करावे, त्याला काँग्रेसने बाहेरून समर्थन द्यावे, अशा प्रकारची रणनीती उभय पक्षांनी आखल्याचे सांगण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: