Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना अतिरिक्त बियाणं पुरवणार
ऐक्य समूह
Wednesday, November 06, 2019 AT 10:55 AM (IST)
Tags: mn1
5मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) : अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना महाबीजच्या माध्यमातून अतिरिक्त बियाणं पुरवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर शेतकर्‍यांना पीकविम्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांसोबत समन्वय साधण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आगामी रब्बी हंगामाची तयारी आणि योजनेची आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी मंत्री डॉ. अनिल बोंडे, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, राम शिंदे उपस्थित होते.
बैठकीत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागातील शेतकर्‍यांना बियाणे, खते यांची गरज आणि उपलब्धतेचा तसेच मदतीसाठी कोणती पावले उचलण्यात आली याचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाबीजद्वारे पीडित शेतकर्‍यांना अतिरिक्त बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आाला. त्याचबरोबर शेतीशाळेचे आयोजन, पीक सल्ला, पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांची शक्यता यांचा आढावा घेत यासाठी काय उपायोजना करण्यात आल्या आहेत, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना पीक विम्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांसोबत समन्वय साधण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: