Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोल्हापूर नाक्यावर ट्रकची दुचाकीला धडक; चिमुरडी ठार
ऐक्य समूह
Wednesday, November 06, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 5 : येथील कोल्हापूर नाक्यावर ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसून अपघात झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. या अपघातात एक नऊ वर्षांची मुलगी जागीच ठार झाली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या.  यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
सोनाक्षी सतीश शेटे (वय 9, रा. कुंभारगाव, ता. पाटण) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे तर तानाजी शंकर खराडे (वय 60), रुक्मिणी तानाजी खराडे (वय 50, रा. कालेटेक, ता. कराड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. विक्रम शंकरलाल विष्णोदी (वय 27 ,रा. जोधपूर-लांभा, राजस्थान) असे गुन्हा नोंद झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तानाजी खराडे हे दुचाकीवरून आपली पत्नी व नातीसह कालेहून कराडच्या दिशेने येत होते.   
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे ते आले असता कोल्हापूरच्या बाजूने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये सोनाक्षी शेटे ही ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तानाजी खराडे व रुक्मिणी खराडे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातस्थळी जमलेल्या संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या. यावेळी काही तास पुणे-बंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: