Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
15 लाख रुपयांचे सोने घेवून पळालेल्या दोन कारागीरांना अटक
ऐक्य समूह
Wednesday, November 06, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: lo1
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
5सातारा, दि. 5 : सातार्‍यातील एका सराफाचे 15 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने घेवून पळून गेलेले उत्तर प्रदेशातील दोन कारागीरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळमध्ये जेरबंद केले असून त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. दोन्ही आरोपींना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना दि. 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश रमेश घोडके, रा. कोटेश्‍वर मैदानानजीक, सातारा यांचे येथील शनिवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी निसार शेख खान व प्रभुदेवा उत्तर प्रदेशातील कामगारांनी त्यांच्या विश्‍वासाचा गैरफायदा घेत 15 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने घेवून पळ काढला होता. या घटनेमुळे सराफ बाजारात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपींचा शोध जारी ठेवला होता.
दि. 4 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने निसार खान व प्रभुदेवा या दोघांना भोपाळ राज्यात जावून ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असून सोमवारी या दोन्ही आरोपींना तपासासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात  देण्यात आले. त्या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दि. 8 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: