Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काळजीवाहू सरकारला शेतकर्‍यांची काळजी नाही
ऐक्य समूह
Wednesday, November 06, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: mn2
थोरात यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
5मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षी राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडी झाल्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्यात काळजीवाहू सरकार आहे. पण या सरकारला लाखाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची काळजी नाही, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने राज्यपालांना अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अतिवृष्टीमुळे कोणतेही पीक शिल्लक राहिलेले नाही. शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झालेली आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहायला हवे. राज्यात काळजीवाहू सरकार असले तरी त्यांना शेतकर्‍यांची काळजी नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्य सरकार, पीक विमा कंपन्या आणि केंद्राने शेतकर्‍यांना तातडीने मदत करावी, त्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे   करण्यात यावेत.  कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूरपरिस्थिती निवारण्यासाठीचे सहा हजार कोटी केंद्राने अजून दिलेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार आता अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्‍यांना दहा हजार कोटी देणार का, असा सवाल थोरात यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांची खिल्ली उडवली. तावडे विधानसभेचे सदस्य नाहीत. ते भाजपचे प्रमुख नेतेही नाहीत आणि त्यांना विधानसभेत मतदान करण्याचा अधिकारही नाही. असे असताना ते राज्यपालांना भेटून काय करणार आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आले असते तर समजू शकलो असतो, असे सांगतानाच राज्यपाल कोश्यारी भाजपचे नेते होते. मुख्यमंत्री होते. कदाचित निवडणुकीतील तिकीट का कापले हे विचारण्यासाठी तावडे राज्यपालांना भेटले असावेत, असा चिमटा त्यांनी काढला.
हेक्टरी एक लाखाची मदत द्या
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना दहा हजार कोटींची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही मदत अतिशय तुटपुंजी असून शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी जाहीर करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकर्‍यांची अवस्था दयनीय आहे. भाजीपाला आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनीच या प्रश्‍नात हस्तक्षेप करावा. सरकारने सेफ अ‍ॅडव्हान्स काढून शेतकर्‍यांना मदत करावी. शेतकर्‍यांना बियाणे आणि खतही मोफत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातला शेतकरी मोडला, तर हे सरकारही पडेल
अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकारने उभे राहायला हवे. शेतकरी मोडला तर हे सरकारही पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या
आघाडी सरकारच्या काळात कधीही अशी परिस्थिती आली नव्हती. द्राक्षांच्या बागासह सोयाबीन, मका, बाजरीसारखी पिकं पूर्णपणे वाया गेली आहेत. उसाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत दिली जावी तर सोयाबीन, मका, बाजरी यासारख्या पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची मदत सरकारने करायला हवी. त्यात समुद्रात वादळ निर्माण झाले असल्याने मच्छिमारांचाही प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करावी तसेच पीककर्ज माफ करावे, वीज बिल माफ करावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचे पवार यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: