Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपची स्वबळावर सरकार स्थापण्याची तयारी, शिवसेनेला अल्टीमेटम!
ऐक्य समूह
Wednesday, November 06, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: mn4
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार : पाटील
5मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली कोंडी फुटत नसल्याने भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेला आपला निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला आहे. भाजप कोअर कमेटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश दिला असून त्याचा आदर करुन लवकरात लवकर सरकार स्थापन करु, असे सांगितले. शिवसेनेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही, मात्र चर्चेसाठी आमची दारं नेहमीच खुली असल्याचे सांगतानाच भाजपकडून आता कोणताही प्रस्ताव पाठवला जाणार नाही, असे त्यांनी सूचित केले. तर लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेचे सूतोवाच केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीला जाऊन पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व त्यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली होती. यावेळी झालेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आदी नेते उपस्थित होते. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा व सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना सोबत आली तर त्यांच्यासमवेत नाही तर त्यांच्याशिवाय सरकार स्थापन करावे व बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून मिळणार्‍या मुदतीत शिवसेनेबरोबर चर्चा करून त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न करावेत, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.
येणार तर
फडणवीस सरकारच !
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व मित्रपक्षांना घेऊन महायुतीचे सरकार लवकरच स्थापन केले जाईल, असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन केले जाईल. त्यांच्या नावाला केंद्रातूनही संमती मिळाली आहे. संपूर्ण भाजप मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. संसदीय समितीनेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला  मंजुरी दिली असल्याचे सांगताना याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेच चंद्रकांत पाटील यांनी सूचित केले.
शिवसेनेबरोबर चर्चेचे दरवाजे खुले !
सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं नेहमीच खुली असल्याचे पाटील यांनी सांगितले. लोकसभेच्या वेळी जे ठरले आहे त्याचेच भाजपने पालन करावे, वेगळा प्रस्ताव देण्याची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र आज चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने प्रस्ताव पाठवावा, असे सांगून आपल्या बाजूने कोणताही प्रस्ताव जाणार नसल्याचेच सूचित केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असे स्पष्ट केले. यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेणार यावर पुढचे राजकारण अवलंबून असणार आहे.
लवकरच चांगली बातमी मिळेल : मुनगंटीवार
आमची शिवसेनेसोबत कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे. आम्ही शिवसेनेची वाट पाहात आहोत. शिवसेनेसोबत संवादाची आमची तयारी असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. जनतेला जास्त वाट पहावी लागणार नाही. उद्यापासून हे सरकार पूर्ण क्षमतेने काम करताना दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या समंजसपणाचे स्वागत,
पण प्रस्ताव लेखी द्या : राऊत
भाजप जर कोणत्याही मुद्द्यावर शिवसेनेसोबत चर्चा करायला तयार असेल तर त्याचे स्वागतच आहे. पण शिवसेना आजही भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेत जे ‘ठरले आहे’ त्या प्रस्तावावरच ठाम आहे. भाजपने प्रस्ताव लेखी द्यावा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. भाजपच्या कोअर कमिटीच्या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत चर्चेसाठी आमची दारे चोवीस तास उघडी असतील तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसोबत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायची आमची तयारी आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण झालेला दोन्ही पक्षांमधील ‘डेडलॉक’ काहीसा खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने चर्चेसंदर्भात
जर असा समंजसपणा आधी दाखविला असता तर इतक्यात सरकार देखील स्थापन झाले असते. पण अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेत जे ठरले आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. भाजप जर म्हणत असेल की शिवसेनेने प्रस्ताव पाठविलेला नाही तर जे ठरले होते तोच शिवसेनेचा प्रस्ताव आहे. त्यापेक्षा वेगळा प्रस्ताव नाही. ठरल्याप्रमाणेच व्हावे ही शिवसेनेची भूमिका आहे. भाजपने तसे लेखी द्यावे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: