Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मलकापूर येथे गोळ्या झाडून युवकाचा खून
ऐक्य समूह
Thursday, November 07, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: re1
कराड-मलकापूरमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकले
5कराड, दि. 6 : ऑगस्ट महिन्यामध्ये टोळी युद्धातून झालेल्या खुनानंतर तीनच महिन्यात बुधवारी रात्री पुन्हाएकदा कराड-मलकापूरमध्ये टोळीयुद्धाचा भडका उडाला. मलकापूर येथील जाधववस्ती परिसरातील विकास रघुनाथ लाखे या युवकावर अज्ञात तीन ते चार जणांनी बेछूट गोळीबार करत त्याचा निर्घृण खून केला. घटनेनंतर काही मिनिटातच घटनास्थळ व कृष्णा हॉस्पिटल परिसरात लोकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, की कराड तालुक्यात काही महिन्यांपासून टोळीयुद्धातून खुनासारख्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात वर्चस्ववादातून अधूनमधून अशा घटना घडतात. ऑगस्ट महिन्यात मध्यरात्रीच्या सुमारास टोळीच्या वर्चस्ववादातून पवन सोळवंडे याचा खून झाला होता. 
या प्रकरणी पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना ताजी असतानाच मलकापूर आगाशिवनगर येथील जाधववस्ती परिसरातील जॅकवेलकडे जाणार्‍या रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन ते चार जणांनी विकास रघुनाथ लाखे (वय अंदाजे 30 वर्ष), रा. दांगटवस्ती, मलकापूर याच्यावर बेछूट गोळीबार करत पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी त्या दिशेने धाव घेतली असता विकास लाखे हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसले. त्या ठिकाणी गोळा झालेल्यांपैकी काही युवकांनी विकासला तत्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव घटनास्थळी दाखल झाले. विकास लाखे याच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त परिसरात वार्‍यासारखे पसरले. त्यामुळे आगाशिवनगर, मलकापूर येथे तणावाचे वातावरण होते. लोकांनी घटनास्थळ आणि कृष्णा हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती. वातावरण तंग असल्यामुळे तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व धीरज पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तसेच संबंधित अधिकार्‍यांना तपासाबाबत सूचना केल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: