Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे : शरद पवार
ऐक्य समूह
Thursday, November 07, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: mn3
शेवटच्या तासापर्यंत वाट बघू!
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्याचा प्रश्‍नच नाही. शिवसेना-भाजपकडे बहुमत असल्याने त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावे आणि हा पेच संपवावा, असा सल्ला देतानाच तुर्तास अन्य पर्यायाचा विचार होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. मी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले असल्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यात काहीही रस नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळजवळ दोन आठवडे होत आले तरी सत्ता स्थापनेचा  तिढा सुटलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना शरद पवार यांनी खास शैलीत उत्तरे दिली. राज्याला स्थिर सरकार मिळावे या संदर्भात तुमची काय भूमिका आहे, असा सवाल केला असता ते म्हणाले, ‘जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. शिवसेना आणि भाजप यांची 25 वर्षांची युती आहे. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावे आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी’. ‘आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आकडे असते तर आम्हीच राज्यात सरकार स्थापन केले असते,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भीती फक्त शिवसेनेला वाटत आहे. 25 वर्षे युतीत सडले तरीही शिवसेना भाजपसोबतच लढली, असा टोलाही त्यांनी लगावला.
एका तासात काहीही होऊ शकते !
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीसंदर्भात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्याशी टेलिफोनवरही चर्चा केली. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकाही सुरू आहेत. राज्यात विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. पण चोवीस तास संपण्याच्या शेवटच्या तासावरही आमचा विश्‍वास आहे. त्या एका तासात काही तरी चांगले होईल यावर आमचा विश्‍वास आहे, असे सूचक विधान करताना त्यानंतर वेगळा विचार पुढे येऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले.  शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, संजय राऊत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नाहीत. नेहमी भेटतात तसे भेटले. येत्या 18 तारखेला राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यात काही गोष्टी एकत्रित मांडण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली.
गुणवत्तेवर सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे.
अमित शहांच्या ‘त्या’ कौशल्याची प्रतीक्षा !
मागच्या काही काळात अनेक राज्यात बहुमत नसतानाही अमित शहा यांनी सत्ता स्थापन केली, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारताच ‘त्यांच्या या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेने वाट पाहत आहोत. त्यांनी सरकार बनवावे,’ असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले.
रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणी शांतता राखा
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. अयोध्येच्या निकालानंतर शांतता राखावी. कोणत्याही समाजातील व्यक्तीने अयोध्येचा आलेला निर्णय हा आपल्या विरोधातील आहे, असे समजू नये. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य करावा. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य कायम रहावे, यासाठी सर्वांनी मदत करावी. कोणत्याही व्यक्तीने कायदा आपल्या हाती घेऊ नये. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
राज्यात व देशात पोलिसांची अवस्था गंभीर
दिल्लीत पोलिसांना जी वागणूक मिळाली आहे त्याबद्दल खंत व्यक्त करतानाच युनिफॉर्म असलेल्या व्यक्तींवर हल्ला होतो म्हणजे संरक्षण करणारी यंत्रणा संकटात येत आहे हे स्पष्ट होत आहे. राज्यात व देशात पोलिसांची अवस्था सध्या गंभीर आहे. पोलिसांना 24-24 तास कर्तव्य पार पाडवे लागते. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे जर कोसळले तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पोलिसांना दिल्लीतील नागरिकांनी पाठिंबा दिला होता. त्याबद्दल दिल्लीच्या नागरिकांचे आभार व त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. मात्र, राजधानीत जो प्रकार घडला त्याबाबत केंद्राला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी याची दखल घेतली काय माहीत नाही. परंतु ही गंभीर परिस्थिती आहे, असेही पवार म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: