Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सत्ता स्थापनेतील कोंडी कायम!
ऐक्य समूह
Thursday, November 07, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn1
पवारांचे ‘वेट अँड वॉच’, शिवसेनेच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : विद्यमान सरकारची ‘एक्सपायरी डेट’ दोन दिवसांवर आली असली तरी युतीतील संघर्षामुळे नवीन सरकारच्या स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. शिवसेनेने ‘अबकी बार, आर या पार’ अशी ठाम भूमिका घेतल्याने स्वबळावर अल्पमतातले सरकार स्थापन करावे की नाही याबाबत भाजपतही संभ्रम आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार आहेत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज महायुतीला जनादेश मिळाला असल्याने त्यांनीच सरकार स्थापन करावे, असे सांगताना तुर्तास कोणत्याही अन्य पर्यायाचा विचार होणार नसल्याचे स्पष्ट केले. येत्या दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी देऊ असे सांगत सत्तास्थापनेचे सूतोवाच केले होते. पण आज दिवसभरात झालेल्या घडामोडी बघता तशी कोणतीही चिन्हं दिसली नाही. उलट पेच अधिक गंभीर झाला आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाल्याशिवाय तोडगा निघणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे तर या पदाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही या निर्णयावर भाजप ठाम असल्याने सहमतीने तिढा सुटण्याची शक्यता मावळत चालली आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत
भाजप हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपालांची निश्‍चितच भेट घ्यावी. बहुमतासाठी ते निश्‍चितच 145 आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र काहीही झाले तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. 
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच गोड बातमी सुधीर मुनगंटीवार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपने अद्याप तरी कोणताही प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदारांची बैठक!
या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची गुरुवारी मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. सरकार स्थापनेच्या दृष्टीने पुढच्या काही तासातच अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याने शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीला महत्त्व आले आहे.
राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल?
शिवसेनेशी समझोता झाला नाही तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याची तयारी भाजपने केली होती. परंतु आज दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर अल्पमतातले सरकार स्थापन करू नये, असे ठरवण्यात आल्याचे समजते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: