Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार
ऐक्य समूह
Thursday, November 07, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या (दि. 7 रोजी) राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचे सांगितल्याने भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही याचा सस्पेन्स वाढला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील  यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्याबाबतची माहिती दिली. काही गोष्टींचा थोडा संयम ठेवा. तुम्हाला गोड बातमी लवकरच मिळेल. उद्या राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे. त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर महायुतीच्या फॉर्म्युल्याची माहिती मीडियाला दिली जाईल. राज्यपालांना भेटल्यानंतर उद्याच सर्व गोष्टींचा उलगडा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुका होऊन 13 दिवस उलटल्यानंतर उद्या पहिल्यांदाच भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी सत्ता स्थापनेबाबतची कोणतीही चर्चा झालेली नसताना भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी असणार नाही. यावेळी राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. सत्तेचा दावा सादर केला जाणार नसल्याचे संकेत मुनगंटीवार यांनी दिल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीत राष्ट्रपती राजवटीवर चर्चा केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री राज्यपाल भेटीपासून दूर?
दरम्यान, उद्या चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळात नसल्याने उद्या भाजपकडून राज्यपालांकडे सत्तेचा दावा सादर केला जाणार नसल्याचे सांगण्यात येते तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणूनच राज्यपालांना भेटणार असल्याची सारवासारव मुनगंटीवार यांनी केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: