Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोव्याहून आणलेली साडेचार लाखाची दारू जप्त
ऐक्य समूह
Thursday, November 07, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : गोवा राज्यातून सातारा जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्याकडे एका स्कार्पिओमधून विक्रीसाठी नेण्यात येणारा 4 लाख 51 हजार 580 रुपये किंमतीचा अवैध दारूसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. दि. 5 रोजी वाढे फाट्यावर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी राहुल रमेश खलाटे (वय 27), रा. जयमल्हार सोसायटी, खेड, सातारा यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेली माहिती अशी, दि. 5 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना एक इनोव्हा व स्कार्पिओ कारमधून गोवा राज्यातून आणलेली अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास या दोन्ही कारवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पथकाने राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा येथे सापळा रचला.  
यावेळी कराडकडून येत असलेल्या स्कार्पिओ क्रमांक (एम. एच. 04 एफ. आर. 1333) या कारला थांबवून तपासणी केली असता त्या कारमध्ये मॅकडॉल्स व इंपेरिअल ब्लू कंपनीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. त्याबाबत स्कार्पिओमध्ये असलेल्या राहुल खलाटे यास विचारणा केली असता त्याने सदरची दारू ही गोवा राज्यातून खरेदी करून आणली असून ती अहमदनगर जिल्ह्यात घेवून जात असल्याचे सांगितले. पथकाने कारमधील 4 लाख 51 हजार 580 रुपयांची दारू व साहित्य जप्त करत त्याला ताब्यात घेत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिर्के, पोलीस हवालदार सुधीर बनकर, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनील मुल्ला, विशाल पवार, विक्रम पिसाळ व विजय सावंत यांनी सहभाग घेतला.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: