Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रशियाकडून एस-400 लवकर मिळण्यासाठी भारत आग्रही
ऐक्य समूह
Thursday, November 07, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 6 : रशियाकडून मिळणार्‍या एस-400 सर्फेस टू एअर मिसाइल प्रणालीची डिलिव्हरी लवकर मिळावी यासाठी भारत आग्रही आहे. भारताने रशियाला आतापर्यंत यासाठी सहा हजार कोटी रुपयेही दिले आहेत. त्यामुळे विनाविलंब एस-400 भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी भारत प्रयत्नशील असून त्यासाठी रशियाला विनंती केली जाणार आहे. या मिसाइलमध्ये 380 कि. मी. क्षेत्रातील लढाऊ विमान, मिसाइल आणि ड्रोन हाणून पाडण्याची क्षमता आहे.
ऑक्टोबर 2018 मध्ये भारत आणि रशियाने पाच एस-400 मिसाइल सिस्टिमसाठी 5.43 बिलियन म्हणजेच जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार  रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणार्‍या 19 व्या भारत-रशिया सैन्य आणि सैन्य तंत्रज्ञान सहयोग आंतरशासकीय आयोग (आयआरआयजीसी-एमटीसी) मध्ये मिसाइल लवकर मिळावे यासाठी चर्चा होणार आहे.
या बैठकीत भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री सरगेई शोइगू सहभागी होणार आहेत. दोघेही या बैठकीचे अध्यक्ष असतील. याच बैठकीत अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी अकुला-1 च्या लीजबाबतही चर्चा होईल. या पाणबुडीसाठी तीन बिलियन म्हणजेच 21 हजार कोटी रुपयांच्या करारावर यावर्षी मार्चमध्ये हस्ताक्षर करण्यात आले होते.
भारत आणि रशिया यांच्यातील प्रतिनिधी स्तरावरील चर्चेत सैन्य सामग्रीबाबत चर्चा होणार आहे. अकुला-1 पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी होत नाही तोपर्यंत आयएनएस चक्रची लीज वाढवली जावी, अशी भारताची इच्छा आहे. अकुला-1 पाणबुडी 2025 पर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.  
एस-400 स्न्वाड्रनची डिलिव्हरी ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2023 या काळात होणे प्रस्तावित आहे. भारतासाठी चीन आणि पाकिस्तान यासारखे शेजारी असताना या प्रणालीचे मोठे महत्त्व आहे. चीननेही रशियाकडून ही प्रणाली खरेदी केली आहे. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही भारताने रशियासोबत एस-400 साठी करार केला होता. राजनाथ सिंह गुरुवारी सेंट पीटर्सबर्गमध्ये एस-400 तयार होत असलेल्या ठिकाणालाही भेट देण्याची शक्यता आहे.  ठरलेल्या करारानुसार ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2023 पर्यंत भारताला पाच एस-400 सिस्टिम मिळतील. एस-400 करारातील 15 टक्क्याचा पहिला हप्ता द्यायला विलंब लागला. पण आता हे पैसे देण्यात आले आहेत. ठरलेल्या मुदतीत मिसाइल सिस्टिम देण्याचे आश्‍वासन रशियाने दिले आहे. पण भारताचे त्यापूर्वी ही मिसाइल सिस्टिम मिळवण्याचे प्रयत्न आहेत. 27 फेब्रुवारीचा डॉगफाइटचा प्रसंग लक्षात घेता भारताकडे अशी सिस्टिम असणे आवश्यक आहे. कारण त्यादिवशी पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत. त्यामुळे भारताची हवाई सुरक्षा बळकट करण्यासाठी एस-400 सारखी सिस्टिम अत्यावश्यक आहे.
कशी आहे एस-400 सिस्टिम
एस-400 ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याला नाटो संघटनेने एसए-21 ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे 30 कि.मी. उंचीवरील आणि 400 कि.मी. अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण 600 कि.मी. अंतरावरील 100 लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते. त्यासाठी एस-400 प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘9 एम 96 ई’ हे क्षेपणास्त्र 40 कि.मी.वरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘9 एम 96 ई 2’ हे क्षेपणास्त्र 120 कि.मी.वर मारा करू शकते. ‘48 एन 6’ हे क्षेपणास्त्र 250 कि.मी.वर तर ‘40 एन 6’ हे क्षेपणास्त्र 400 कि.मी.वर मारा करू शकते.
रशियाने 1980 च्या दशकाच्या अखेरीस एस-400 विकसित करण्यास सुरुवात केली आणि 2007 मध्ये ही यंत्रणा रशियन सेनादलात सामील करून घेण्यात आली. रशियातील मॉस्कोसह काही शहरांना या प्रणालीचे संरक्षण आहे. रशियाने सीरियातील नाविक आणि हवाई तळ आणि युक्रेनकडून बळकावलेल्या क्रिमिया प्रांतात एस-400 प्रणाली तैनात केली आहे. एस-400 ही त्यापूर्वीच्या एस-300 या क्षेपणास्त्र प्रणालीची सुधारित आवृत्ती आहे. तिला नाटोने एसए-10 ग्रंबल असे नाव दिले होते. त्यातील ‘48 एन 6 ई’ या क्षेपणास्त्राचा पल्ला 5 ते 150 कि.मी. आहे. ती अधिकतम 30 कि.मी. उंची गाठू शकतात. सोव्हिएत सेनादलात ती 1979 पासून कार्यरत आहेत. भारतीय सेनादलात एस-300 प्रणाली यापूर्वीच कार्यान्वित आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: