Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नीरा उजव्या कालव्यात ट्रक कोसळल्याने दोघांचा बुडून मृत्यू
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: re5
5फलटण, दि. 7 : फलटण-पंढरपूर राज्य मार्गावर फलटण शहरालगत धुळदेव गावच्या हद्दीत नीरा उजवा कालव्यावरील पुलाचा कठडा तोडून कालव्याच्या पाण्यात पलटी झालेल्या  ट्रकच्या केबिनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवार, दि. 6 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास फलटण-पंढरपूर रस्त्यावर नीरा उजवा कालव्यावरील रावरामोशी पुलाच्या धोकादायक वळणावर, वळणाचा अंदाज न आल्याने मोठा 12 चाकी ट्रक (एपी 02 टीबी 9945) पुलाच्या संरक्षक कठड्याला लावलेला पत्रा तोडून कालव्याच्या पाण्यात पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रकमधील चालक व क्लिनर असे दोघे पाण्यात अडकल्याची शक्यता व्यक्त होत होती., परंतु रात्रीच्या अंधारात या अवजड ट्रकला बाजूला करून पाण्यातील केबिनमध्ये कोणी आहे किंवा नाही आणि असेल तर त्याला बाजूला करण्यात मोठी अडचण झाली होती.
दरम्यान, फलटण शहर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक पाण्यातून वर उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, मूळचा अवजड ट्रक आणि त्यामध्ये भरलेले साहित्य यामुळे एका क्रेनने ट्रक उचलण्यात पोलिसांना यश आले नाही. परिसरातील ग्रामस्थ तरुण व पोलिसांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता केबिनमध्ये दोन इसम असल्याचे आढळून आले. मात्र, अवजड ट्रक बाजूला करून या दोघांना बाहेर काढणे कठीण झाले होते.   
पाण्यात उतरून शोध घेणे व मृतदेह बाहेर काढण्याकामी अनिल बनकर, किरण नाळे, महेेश तळेकर, सूरज आडके, वसंत मदने, सुनील काळे यांच्यासह  ग्रामस्थांनी पोलिसांना  मदत केली.  गुरुवार, दि. 7 रोजी सकाळी पोलिसांनी 3 मोठ्या क्रेन मागवून ट्रक बाहेर काढला. त्यावेळी ट्रकच्या केबिनमध्ये मुल्ला मुस्तहान वली (वय 52, रा. अल्लाबक्ष गल्ली, ताडपत्री अनाथपुरम, आंध्रप्रदेश) आणि लक्ष्मीनारायण रेड्डी (वय 49, रा. पुतलूर मांडमल मद्दीपल्ली अनाथपुरम, आंध्रप्रदेश) या दोघांचे मृतदेह आढळून आले. रावरामोशी पुलानजीकचे हे वळण धोकादायक असल्याने त्या ठिकाणी या पूर्वीही अनेकवेळा अपघात झाले असून काहींना त्यामध्ये मृत्यूही आला आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाच्या संरक्षण कठड्यात काही दुरुस्त्या केल्या आहेत.  त्या पुरेशा नसल्याने या अरुंद पुलावर सतत अपघाताचे सत्र सुरू असून सदर पूल धोकादायक वळण काढून मागे किंवा पुढे अन्यत्र हलविण्याची आवश्यकता यापूर्वीही अनेकवेळा व्यक्त झाली आहे. मात्र, त्याबाबत संबंधित यंत्रणा ठोस निर्णय घेत नसल्याने अपघाताचे सत्र सुरूच असून आणखी किती जणांचे बळी  गेल्यानंतर याबाबत उपाययोजना करणार असा संताप व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून  पोलीस उपनिरीक्षक दळवी अधिक तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: