Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुंता सुटेना, महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: mn1
शिवसेना आज निर्णय जाहीर करणार
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) :  मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता आणखी वाढली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सद्य राजकीय स्थितीची माहिती देताना सत्ता स्थापनेचा दावा मात्र केला नाही तर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाशिवाय कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही अशी टोकाची भूमिका घेत आपल्या आमदारांना ‘रंगशारदा’ या तारांकित हॉटेलात हलवल्याने कोंडी फुटण्याची शक्यता मावळत चालली आहे. दरम्यान रात्री शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी युती करण्याचे सर्व अधिकार पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना दिल्याचे सांगत शुक्रवारी याबाबतचा निर्णय होईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यास काही तास उरले असले तरी राज्यातील नवीन सरकार स्थापनेचा गुंता अजून सुटला नाही. किंबहुना हा गुंता अधिक वाढत चालला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती त्यांना दिली. चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार हे नेते होते. युतीचा वाद सुटला नाही तर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सत्तास्थापनेचा दावा करेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने दावा करण्याचे टाळले आहे. राज्यपालांशी भेटीनंतर पत्रकारांना माहिती देताना चंद्रकांत पाटील यांनी, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला अतिशय स्पष्ट जनादेश दिलेला असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असल्याचे सांगितले. परंतु सत्तास्थापन करण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने आम्ही आज राज्यपालांना भेटण्यास आलो होतो. या स्थितीत कोणते कायदेशीर मुद्दे व मार्ग आहेत याची चर्चा केली. त्याचसोबत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीची माहितीही त्यांना दिली. राज्यात सध्या नेमके काय चालले आहे यावर खूप   सविस्तर चर्चा झाली. राज्यपालांशी झालेल्या चर्चेच्या आधारे पुढे काय करायचे याचा निर्णय करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
मला युती तोडायची नाही, पण....!
सरकार स्थापनेतील पेचाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे ठरले तेच व्हावे. यापेक्षा अधिक अपेक्षा नाही. मला स्वतःला युती तोडायची नाही. आता भाजपने काय तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका स्पष्ट केली.
पुढील 48 तास निर्णायक !
विद्यमान विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. तोवर नवीन सरकार आले नाही तर विद्यमान सरकारला राजीनामा द्यावा लागेल. राज्यपाल त्यांना काही काळ काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्यास सांगू शकतात. त्यानंतर राज्यपाल सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थपनेसाठी पाचारण करू शकतात. भाजपने असमर्थता दर्शवली तर अन्य शक्यता पडताळून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणारा अहवाल राज्यपाल केंद्र सरकारकडे पाठवू शकतात. या प्रक्रियेला किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. परंतु पुढील 48 तासात राज्यात नवे सरकार आले नाही तर पेच आणखी वाढणार असल्याने हे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: