Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अपघातात जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: lo2
नातेवाईक संतप्त; परिवहन मंत्र्यांची मदतीकडे पाठ
5सातारा, दि. 7 : चार दिवसापूर्वी सातारा येथील शिवराज पेट्रोल पंपानजीक एस. टी. बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात नांदगाव, ता. सातारा येथील गर्भवती महिलेचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. कल्याणी वैभव देशमुख असे त्यांचे नाव आहे. गेल्या चार दिवसांमध्ये एस. टी. विभागाचा एकही अधिकारी रुग्णालयाकडे न फिरकल्यामुळे देशमुख कुटुंबीयांनी संतप्त   प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देऊन संबंधित देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली असता, मंत्री रावते यांनी नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही असे प्रत्युत्तर दिले. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 4 रोजी सकाळी नांदगाव, ता. सातारा येथील सौ. कल्याणी वैभव देशमुख या आपले पती वैभव देशमुख यांच्यासमवेत नांदगाव येथून सातारकडे दुचाकीवरून सोनोग्राफी करण्यासाठी येत असताना सातारा येथे शिवराज पेट्रोल पंपानजीक मुंबईहून कराडकडे जाणार्‍या एस. टी. बस चालकाच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला जाऊन वैभव देशमुख यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात देशमुख दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
देशमुख कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून गेले चार दिवस रुग्णालयीन खर्च त्यांचे नातेवाईक पैसे जमा करून भागवत आहेत. अशातच एवढी मोठी दुर्घटना होऊनही एस. टी.चा एकही जबाबदार अधिकारी रुग्णालयात आला नाही, विचारपूस केली नाही त्यामुळे देशमुख कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहेे. अशातच आज सकाळी कल्याणी देशमुख यांची प्रकृती बिघडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले असून त्यांनी याबाबत एस. टी. विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांनी रुग्णालयात धाव घेऊन एस. टी. अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देत देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली असता जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही, असे सांगून त्यांनी बोळवण करण्याचा प्रयत्न केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: