Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण तालुक्यात बिबट्याचे पाळीव जनावरांवर हल्ले
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: re6
5पाटण, दि. 7 : पाटण तालुक्यातील कवडेवाडी, काढणे परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्यांनी पाळीव जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. कवडेवाडी येथील आनंदा सखाराम कदम यांच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला तर काढणे येथे बिबट्याने शेतकर्‍यांच्या शेडमधील जनावरे, कोंबड्या, पाळीव कुत्री यांच्यावर हल्ले करून त्यांना फस्त केले आहे.
कवडेवाडी येथील आनंदा सखाराम कदम यांच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये एक शेळी ठार झाली तर एक गंभीर जखमी झाली आहे.  वन विभागाने बिबट्याचा शोध घेवून, पिंजरा लावून त्याला जेरबंद करावा तसेच  संबंधित शेतकर्‍याला वन विभागाने तातडीने पंचनामा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.  
याबाबत माहिती अशी, कवडेवाडी येथील आनंदा सखाराम कदम हे  आपल्या घेरादातेगड येथील गट क्रमांक 22 मध्ये नेहमीप्रमाणे शिवारात शेळ्या चारावयास गेले होते. शेळ्या चारून सायंकाळी घरी परतत असताना घनदाट झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळ्यांच्या कळपातील दोन शेळ्यांवर  हल्ला केल्याने काही शेळ्या पळून गेल्या. त्या कळपात असणार्‍या एका शेळीवर बिबट्याने झडप घालून घनदाट तिला जंगलात  घेवून गेला तर एक शेळी गंभीर जखमी केली. या बिबट्याच्या हल्ल्यात संबंधित शेतकर्‍याचे सुमारे 15 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
संबंधित शेतकर्‍याची घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्याचे जीवन हे पशुपालनावर अवलंबून असून या घटनेची वन विभागाने गंभीर दखल घेवून तातडीने पंचनामा करून त्या नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. दरम्यान, मेष्टेवाडी, पिंपळोशी, टोळेवाडी, घेरादातेगड, जाईचीवाडी, बोंद्री,
कातवडी, कवडेवाडी, पाटण येथील स्टेडियम परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी जोमात सुरू आहे. यामध्ये भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन आदी
पिकांची सुगी सुरू आहे. ही पिके काढण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये धांदल सुरू आहे. बिबट्याच्या दर्शनाने शेतकर्‍यांसह महिला शेतात काम करण्यास धजावत नसल्याचे पहावयास मिळत आहे. वन विभागाने सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरू लागली आहे.
काढणे परिसरात भीतीचे सावट
5सणबूर : काढणे, ता. पाटण येथे शेताच्या शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून शिवारात वावरताना शेतकर्‍यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात सातत्याने बिबट्याने शेतकर्‍यांच्या शेडमधील जनावरे, कोंबड्या, पाळीव कुत्री यांच्यावर हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून येत आहेत. मानवी वस्ती नजीकचा बिबट्याचा नित्य वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा असून या बिबट्याचे वास्तव्य शिवारातील ऊस शेतीत असावे असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शेतात काम करताना बिबट्याच्या रूपाने अवतीभोवती मृत्यू घुटमळत असल्याचे चित्र असून ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. ढेबेवाडीच्या पूर्वेला तळभागातील हे गाव येथील शेतकरी सचिन जगन्नाथ देसाई यांच्या शेतामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यावर  आठवड्यापूर्वी सकाळच्या प्रहरी बिबट्याने हल्ला केला. गोठ्यात आठ ते दहा जनावरे बांधली होती. दरवाजानजीक असलेले साडे चार महिन्याचे गायीचे वासरू बिबट्याने खेचून नेऊन त्याला ठार केले. दुपारी ग्रामस्थांनी शोध घेतला असता शिवारात अर्धवट खाल्लेले गाईचे वासरू आढळून आले. त्याचबरोबर या घटनेच्या अगोदर काही दिवस महेश बाळासाहेब पाटील यांच्या घरातील पाळीव कुत्र्यावर रात्री आठच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. मात्र लोकांनी गोंगाट करताच बिबट्याने शिवारात धूम ठोकली होती. तसेच उत्तम आनंदराव पाटील यांच्या वडाची टेक येथील शिवारातील शेडमधील अनेक कोंबड्या बिबट्याने हल्ला करून फस्त केलेल्या आहेत. या परिसरात वावरणार्‍या मेंढपाळाच्या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले आहे. अशी बिबट्याच्या हल्ल्याची मालिकाच या परिसरात सुरू असून शिवारात वावरणारे शेतकरी दहशतीखाली आहेत. येथील शेतकरी बाळासाहेब भिकू पाटील, सचिन देसाई यांनी शिवारामध्ये अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. तसे पाहिल्यास ढेबेवाडी विभागातील कित्येक गावे वाड्या-वस्त्या, डोंगरपठारावर बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. प्रत्येक गावामध्ये कुत्री, पाळीव प्राणी यांच्यावर मानवीवस्तीत घुसून बिबट्याचे हल्ले होत आहेत. मात्र वन विभागाने याबाबत कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही.
नुकसानीचे पंचनामे नुकसान भरपाई एवढेच सोपस्कार विभागाकडून केले जात आहेत.
विभागातील अनेक गावात बिबट्याची डरकाळी नित्याची झाली असून यामध्ये शेतकर्‍यांचे पशुधन नष्ट होत आहे. अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून त्याचा धोका वाढलेला आहे.बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. काढणे गावात नित्य वावरणार्‍या बिबट्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: