Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आम्हाला विरोधी पक्षात बसण्यातच स्वारस्य
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 7 : आम्हाला विरोधी पक्षात बसण्यातच स्वारस्य आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यात जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. त्यांनीच सत्ता स्थापन केली पाहिजे. शिवसेनेने पाठिंबा दिल्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. भाजपने शिवसेनेवर अन्याय करू नये. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसताना आपल्या अटींवर कायम असून राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार   हा प्रश्‍न अजून अनुत्तरितच आहे. भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते, असे संजय राऊत वारंवार सांगत आहेत. भाजपनेही शिवसेनेला दटावत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू, असे अल्टिमेटम दिले, असताना या सर्व परिस्थितीवर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आ. जयंत पाटील म्हणाले, आमचा कोणताही आमदार भाजपच्या गळाला लागणार नाही. भाजप इतर पक्षाच्या आमदारांना आमिष दाखवत आहे, मात्र जो आमदार जाईल त्याला इतर सर्व पक्ष मिळून पराभूत करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेने आपापसातील वाद त्वरित मिटवून शेतकर्‍यांना मदतीसाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: