Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पालिकेत मुख्याधिकारी आणि नगरसेवकांची जोरदार खडाजंगी
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
बिले अडवल्याचा आंबेकर यांचा आरोप; शंकर गोरे यांचा सभात्याग
5सातारा, दि. 7 : जैवविविधता समितीच्या निमित्ताने गुरुवारी पालिकेत मुख्याधिकारी आणि नगरसेवकांची जोरदार खडाजंगी झाली.
ठेकेदारांची बिले मुख्याधिकार्‍यांनी अडवली असल्याचा आरोप पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केल्याने रागाच्या भरात मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सभात्याग केला. सभागृहाची परवानगी न घेताच त्यांनी हा प्रताप केल्याने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह सातारा विकास, नगरविकास आघाडीसह भाजपच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, नगराध्यक्षा,  उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेऊन शंकर गोरे यांच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.
सातारा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली.  विषय पत्रिकेचे वाचन झाल्यानंतर सभागृहात मुख्य विषय सोडून अवांतर विषयांवर चर्चा सुरू झाली.
नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी शहरातील खड्ड्यांचा प्रश्‍न उपस्थित करत खड्ड्यांच्या निषेधार्थ खुर्चीवर उभे राहून सभागृहाचे लक्ष वेधले. विनापरवानगी खंदारे यांची बडबड सुरू राहिल्याने नगराध्यक्षांनी त्यांना खडे बोल सुनावल्याने खंदारे यांनी  राजीनाम्याचा पवित्रा घेतला. जैवविविधता समितीसाठी सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी व भाजपच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नावे सुचवून त्यांची समिती गठीत करण्याचा निर्णय झाला.  मात्र समितीची नावे अंतिम न झाल्याने विशेष सभेचा हेतूच सफल झाला नाही. त्या अनुषंगाने सातारा नगरपालिकेत ही समिती गठीत करण्याबाबत विशेष सभा गठीत करण्यात आली. मात्र, यावेळी सातारा शहरातील खड्डे आणि आरोग्यविषयक मुद्द्यांवरून नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरले. सर्वच नगरसेववकांनी टार्गेट केल्याने मुख्याधिकार्‍यांचा राग असह्य झाला. त्यांनी खुर्चीवरून उठत माझ्याशी नीट बोला, असे सुनावत ते सभागृह सोडून गेले. दरम्यान, सर्वच नगरसेवक आक्रमकपणे मुद्दे मांडत असल्याने सभा  गोंधळात पार पडली. जैवविविधता समिती गठीत करण्याबाबत नगरसेवकांना ऐनवेळी माहिती दिल्याबद्दलही मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकार्‍यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला जैवविविधता समिती बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र सातारा नगरपालिकेला  दि. 25 सप्टेंबरला आले होते. ही समिती गठीत करण्यासाठी दि. 28 नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती तसेच या समितीत  नगराध्यक्षा या पदसिद्ध अध्यक्ष, सात नगरसेवक यासह विविध प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संघटना यांचा समवेश असणार आहे. समितीबाबत पालिकेकडून कार्यवाही न झाल्यास प्रतिमहा दहा लाख रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे या जैवविविधता समितीचे कामकाज कसे चालणार याबाबत नगरसेवकांना इतक्या उशिरा माहिती का देण्यात आली? शासनाचे  पत्र पालिकेला 25 सप्टेंबरला आले असताना आतापर्यंत पालिका प्रशासन काय करत होते? दहा लाख रुपये दंड झाला तर तो सर्वसामान्यांच्या करातून भरला जाणार आहे याची जाणीव ठेवावी, असे  नगरसेवक विजय काटवटे म्हणाले. त्यानंतर नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी खड्डे आणि शहरातील डेंग्यूबाबत आरोग्य विभाग उपाययोजना राबवत नसल्यावरून नाराजी व्यक्त करत मुख्याधिकारी शंकर गोरे यांना धारेवर धरले. सातारा शहराची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था आणि डेंग्यू उपाययोजना करण्याबाबत अतिविशेष सभा बोलवा. शहराची अवस्था बघून आता लाज वाटू लागली आहे, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक वसंत लेवे यांनीही समितीच्या माध्यमातून पालिकेला मोठा निधी मिळू शकतो. समितीच्या सदस्यांना का अवगत केले नाही, असा सवाल उपस्थित केला. नगरसेविका सिद्धी पवार यांनी समिती कशावर काम करणार याची माहिती न दिल्याने स्वच्छ भारत प्रमाणे समितीचे कामही कागदोपत्रीच चालणार का  असा आक्षेप घेतला. वसंत लेवे यांनी जैवविविधता समितीच्या अनुषंगाने कार्यशाळा घेण्याची मागणी केली. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या निषेधाचा ठराव अशोक मोने यांनी मांडला. श्रीकांत आंबेकर यांनी त्याला अनुमोदन दिले.
नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
मुख्याधिकारी शंकर गोरे यांची बदली करावी या मागणीसाठी सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी व भाजपच्या  नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने गोरे यांच्या सभात्यागाची तक्रार केली. गोरे यांनी नगराध्यक्षांसह सभागृहाचा अवमान केला आहे. त्यांच्या सर्व्हिस बुकवर याची नोंद करून त्यांची नगरपरिषद संचालनालयाकडे तक्रार करण्याचा एकमुखी पाढा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे वाचण्यात आला.
श्री. छ. उदयनराजे यांच्याकडून गांभीर्याने दखल
विशेष सभा झाल्यानंतर सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद डी.जी. बनकर यांनी श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या कानावर सभेचा कार्यवृत्तांत घालून मुख्याधिकारी शंकर गोरे यांची मनमानी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब उदयनराजे भोसले यांनी गांभीर्याने घेतल्याची माहिती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.
अनेक अधिकार्‍यांची अनुपस्थिती
विशेष सर्वसाधारण सभेला सर्वच अधिकार्‍यांनी उपस्थित राहिले पाहिजे, असा प्रोटोकॉल आहे. विशेष सभेत गांभीर्याने चर्चा होत असते. त्यामुळे सर्व अधिकारी सभेला हजर राहण्याची आवश्यकता असतानाही आज अनेक अधिकार्‍यांनी सभेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: नगरविकास अभियंता भाऊसाहेब पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीबद्दल सौ. माधवी कदम यांनी नाराजी व्यक्त केली.
अपघातात जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू
प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देऊन संबंधित देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली असता, मंत्री रावते यांनी नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही असे प्रत्युत्तर दिले. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 4 रोजी सकाळी नांदगाव, ता. सातारा येथील सौ. कल्याणी वैभव देशमुख या आपले पती वैभव देशमुख यांच्यासमवेत नांदगाव येथून सातारकडे दुचाकीवरून सोनोग्राफी करण्यासाठी येत असताना सातारा येथे शिवराज पेट्रोल पंपानजीक मुंबईहून कराडकडे जाणार्‍या एस. टी. बस चालकाच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला जाऊन वैभव देशमुख यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात देशमुख दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
देशमुख कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून गेले चार दिवस रुग्णालयीन खर्च त्यांचे नातेवाईक पैसे जमा करून भागवत आहेत. अशातच एवढी मोठी दुर्घटना होऊनही एस. टी.चा एकही जबाबदार अधिकारी रुग्णालयात आला नाही, विचारपूस केली नाही त्यामुळे देशमुख कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहेे. अशातच आज सकाळी कल्याणी देशमुख यांची प्रकृती बिघडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले असून त्यांनी याबाबत एस. टी. विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांनी रुग्णालयात धाव घेऊन एस. टी. अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देत देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली असता जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही, असे सांगून त्यांनी बोळवण करण्याचा प्रयत्न केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: