Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डॉ. यशवंतराव मोहिते यांचे राजकारणात सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम : प्रतिभाताई पाटील
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: re1
महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम भाऊंनी केले : शरद पवार
5कराड, दि. 7 ः थोर विचारवंत स्व. डॉ. यशवंतराव मोहिते यांनी राजकारणात सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांनी तत्त्वाशी व विचारांशी कधीच तडजोड केली नाही. सामान्य लोकांच्या हिताचा विचार करताना राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. कृष्णाकाठी यशवंतराव भाऊंसारखा हिरा जन्माला आला आणि तो चमकून गेला, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
रेठरे खुर्द, ता. कराड येथील भारती विद्यापीठाच्या जाई मोहिते प्रशालेत डॉ. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यगौरव समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खा. श्रीनिवास पाटील, सौ. वंदना चव्हाण, खा. संजय मंडलिक, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रा. एन. डी. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, दिलीप वळसे-पाटील, देवीसिंग पाटील, शिवाजीराव कदम, आ. मोहनराव कदम, आ. विश्‍वजित कदम, शेखर निकम, शशिकांत शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्यावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यशवंतराव मोहिते यांच्या भाषणांचे घणाघात, आमचे भाऊ आणि त्यांनी केलेल्या कार्याची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेले जे काही राजकारणी आहेत त्यांच्यात यशवंतराव मोहिते यांचे नाव अव्वल स्थानी आजही आहे. त्यांनी आपली कारकीर्द अत्यंत चांगली गाजवून जनमानसात छाप उमटवली होती. ते तात्विक विचारांनी घट्ट होते आणि हे विचार व ध्येय त्यांनी जनमानसाच्या कल्याणासाठी मार्गी लावले.
शरद पवार म्हणाले, यशवंतराव मोहितेंसाठी सत्ता हा विषय कधीही महत्त्वाचा नव्हता. महाराष्ट्र घडला पाहिजे, हा विचार जोपासणार्‍यांमध्ये त्यांचे नाव अग्रेसर होते आणि आजही आहे. 
त्यांच्या कार्याची माहिती युवा पिढीसमोर येण्याची गरज आहे. यशवंतराव मोहिते यांना शेतकर्‍यांची चांगली जाण होती. काही कर्तृत्ववान माणसे राजकीय पटलावर होऊन गेली, यामध्ये यशवंतराव मोहिते यांचे नाव आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मंत्रिमंडळात असताना  भाऊंनी एका विषयावर सलग 12 तास भाषण देवून मुद्दे सांगण्यासही त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा राज्याच्या राजाकरणासह विधानसभेतही दिसतो.
आ. चव्हाण म्हणाले, सध्याचे राजकारण व त्यांचे विचार यामध्ये मोठा फरक आहे. तो फरक ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी कधीही केला नाही. प्रवृत्तीत बदल न करता तत्त्वाने विरोध करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यामुळेच सर्वाधिक चांगले निर्णय घेवून भाऊंनी राज्याच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्याच विचारांची आणि तत्त्वांची सध्याच्या राजकारणात गरज आहे.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. जयंत पाटील यांना मनोगतात स्व. यशवंतराव मोहिते यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी प्रास्ताविक केले. आ. विश्‍वजित कदम यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. विवेक रणखांबे यांनी सूत्रसंचालन केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: