Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विकास लाखे खून प्रकरणी सहा पथके रवाना
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 7 ः आगाशिवनगर (मलकापूर), ता. कराड येथे पत्त्यांचा क्लब चालविणार्‍या विकास रघुनाथ लाखे (वय 30), रा. आगाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर याच्यावर बेछूट गोळीबार करुन निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी काडतुसांच्या पुंगळ्यांसह धारदार कोयता आढळून आला. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. खुनाच्या घटनेमुळे आगाशिवनगर परिसरात तणावाचे वातावरण असून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी चंद्रकांत रंगराव लाखे (वय 47), रा. आगाशिवनगर, ता. कराड यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.     
दरम्यान, विकास लाखे याच्यावरील बेछूट गोळीबार प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील संशयितांची कसून चौकशी सुरु केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी परजिल्ह्यात सहा पथके रवाना झाली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख धीरज पाटील यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आगाशिवनगर येथील विकास लाखे हा संजय रैनाक यांच्या पोल्ट्री फार्मच्या मागे पत्त्यांचा क्लब चालवत होता. निशिकांत ढेकळे, पोपटराव यादव हे क्लबमध्ये भागीदार आहेत. बुधवारी रात्री 9.15 च्या सुमारास विकास लाखे, निशिकांत ढेकळे, महेश अहिवळे, राजू कुडाळकर थांबले होते. साडेनऊच्या सुमारास ते क्लबमधून बाहेर पडले आणि रस्त्याच्या दिशेने चालत निघाले. पोल्ट्रीच्या परिसरात आल्यावर हल्लेखोरांनी विकास लाखेच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजामुळे निशिकांत ढेकळे, महेश अहिवळे पळाले. तोंडाला रूमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी विकास लाखेला जॅकवेल रस्त्यावर गाठले. त्याच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्याने तो रस्त्यावर कोसळला. विकास रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर गोळ्या घालत असल्याची चर्चा होती. हल्लेखोरांपैकी एकाने धारदार कोयता आणला होता. दरम्यान, रोहित लाखे, प्रणय सुर्वे, कुमार लाखे हे दुचाकीवरून क्लबच्या दिशेने येत होते. गोळीबार झाल्याचे समजताच ते सर्वजण घटनास्थळाकडे धावले. त्यांनी दुचाकीवर विकासला बसवून ते त्याला घेऊन कृष्णा रूग्णालयात गेले. रूग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी विकासला मृत घोषित केले. गोळीबाराच्या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. विकासच्या समर्थकांनी कृष्णा रूग्णालयात गर्दी केली. नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. हल्लेखोरांना तातडीने अटक करा अशी मागणी ते पोलिसांकडे करत होते. विकास लाखे याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: