Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा येथील भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: lo2
नगरसेवकांचा आरोप; शंकर गोरे यांच्या बदलीवर ठाम
शशिकांत कणसे
5सातारा, दि. 8 : सातारा येथे सुरू असणारे भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट पद्धतीने केले जात असून संबंधित ठेकेदाराने ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे त्या ठिकाणी दर्जेदार काम करूनच पुढील काम हातात घ्यावे असा सूर बहुतांश सर्वच नगरसेवकांनी आळवला. दरम्यान, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीवर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती आणि नगरसेवक ठाम असून याबाबतचा निर्णय श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करून घेण्यावर आज शिक्कामोर्तब झाले.
सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी विशेष सभेमध्ये सभात्याग केल्यानंतर त्यांच्या या वर्तनाबाबत सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी आणि भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी आज शुक्रवारी सकाळी 11.30 आपल्या दालनामध्ये उपनगराध्यक्ष, सर्व सभापती आणि नगरसेवकांची गोपनीय बैठक आयोजित केली होती. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती सविता फाळके, मनीषा काळोखे, दीपलक्ष्मी नाईक, वसंत लेवे, रवींद्र ढोणे, ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने, अविनाश कदम, अमोल मोहिते, धनंजय जांभळे, विजय काटवटे  यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी सातारा शहरातील दुहेरी गटार योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा उपस्थित झाल्याने एमजीपीचे जे. ई. अग्रवाल आणि हे काम घेणारे कॉन्ट्रॅक्टर कुमार या दोघांनाही बैठकीला पाचारण करण्यात आले. शहराच्या पश्‍चिम भागात बोगदा, मंगळवार पेठ, रामाचा गोट, चिमणपुरा, व्यंकटपुरा, बोकील बोळ, सुयोग मंगल कार्यालय, कोल्हटकर आळी, बुधवार पेठ परिसर, करंजे पेठ आणि  राधिका रोड परिसरात  काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेचे काम करत असताना खुदाई करताना झालेले लिकेज काढले जात नाही. त्यामुळे चिखल होऊन घसरून पडणे, दुचाकीचा अपघात  दुर्घटना घडत आहेत. रोलिंग व्यवस्थित केले जात नाही. ज्या प्रमाणात खोदले जाते, त्याच प्रमाणात डांबरीकरण होणे आवश्यक आहे, ते केले जात नाही. बांधण्यात येणारी चेंबर्स चांगल्या प्रतीची बांधली जात नाहीत, अशा अनेक तक्रारींचा पाऊस बैठकीमध्ये पडल्यानंतर आत्तापर्यंत ज्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम केले आहे, ते दर्जेदार करूनच पुढील काम हाती घेण्याच्या सूचना नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी संबंधितांना केल्या. तदनंतर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीचा विषय उपस्थित होताच माधवी कदम यांनी बैठकीतूनच श्री. छ. उदयनराजे भोसले यांना दूरध्वनी करून गोरे यांच्या मनमानीचा पाढा वाचला. त्यावर उदयनराजे भोसले म्हणाले, गेल्या दोन दिवसात घडलेल्या सर्व घडामोडी मला समजल्या आहेत. रविवारी मी सातार्‍यामध्ये येत आहे. नंतर चर्चा करून निर्णय घेऊ.  माधवी कदम यांची उदयनराजे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर या मुद्द्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे  यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय झाला. एकूणच दोन्ही राजांशी चर्चा करून, शंकर गोरे यांच्या बदलीचा ठराव घेऊन तो जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे पाठवण्यावर एकमत झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: