Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजप-शिवसेनेने समंजसपणा दाखवावा : शरद पवार
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: mn6
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला सरकार स्थापनेचा कौल दिला आहे. त्याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा. आम्ही तो पेच सोडवू शकत नाही. त्यांनीच समंजसपणा दाखवायला हवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला.
विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबत भाजप, शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत खलबते सुरू असतानाच महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. 
त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. बिघडलेले राजकीय वातावरण दुरुस्त करण्यात पवार यांचा हातखंडा आहे. आताच्या परिस्थितीत काय करायला हवे हा सल्ला घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली, असे आठवले यांनी या भेटीनंतर सांगितले. शरद पवार यांनीही आठवले यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला. आठवले यांनी एका काळजीतून माझी भेट घेतली. मात्र, जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलेला असल्याने आमची भूमिका याबाबतीत मर्यादित आहे. तुम्हीच सेना-भाजपला समजावण्यासाठी जोमाने प्रयत्न करा, असे मी आठवले यांना सांगितल्याचे पवार म्हणाले.
मध्यावधी निवडणुका लगेच होणार नाहीत
आजच्या दिवसात भाजप-शिवसेनेतील वादावर तोडगा न निघाल्यास फेरनिवडणूक होऊ शकते का असे विचारले असता ती शक्यता पवार यांनी फेटाळली. राज्यपाल याबाबत निर्णय घेतील. फारतर राष्ट्रपती राजवट लागू शकते. अर्थात, तो निर्णय राज्यपालांचा असेल. त्यावर मी भाष्य करू शकत नाही, असेही पवार म्हणाले.
काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालेल का?
भाजपला सत्तेपासून लांब ठेवायचे असेल तर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देऊन सरकार बनवण्यास मदत करावी, असा नवा फॉर्म्युला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांनी मांडला होता. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता, काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालणार आहे का, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: