Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्री, भाजप नेते खोटारडे, उद्धव ठाकरेंचा पलटवार !
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: mn2
अमित शहांच्या साक्षीनेच ठरला होता मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द स्वतः भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीत दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यावेळी उपस्थित होते. मात्र आता आम्हाला खोटे ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अच्छे दिनापासून अनेक खोटी आश्‍वासने लोकांनी बघितली असल्याने कोण खोटारडे आहे ते लोकांना माहिती आहे, असे प्रत्त्युत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले. मुख्यमंत्री गोड बोलून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करताना शिवसैनिकला मुख्यमंत्री करण्याचे स्व. बाळासाहेबांना दिलेले वचन आपण पूर्ण करून दाखवणारच, असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला अडीच वर्षांचा शब्द कधीच दिला नव्हता, असे स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजप तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रतिहल्ला केला. अमित शहा यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली ते देखील त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या आधी देखील युतीची चर्चा झाल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, त्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र मी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेचाच मुख्यमंत्री एक दिवस बसवेन, असे वचन दिले आहे. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याइतका मी लाचार नसल्याचे सांगून त्या चर्चेतून मी उठून आलो होतो. नंतर अमित शहा मातोश्रीवर आले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीतच आमची बैठक झाली. त्यातच अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे ठरले. पण हे आता जाहीर करूया नको तसे केले तर मला पक्षात अडचण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तेव्हा शब्दांचे खेळ करत त्यांनी पद आणि जबाबदारीचे समसमान वाटप होईल, असे जाहीर केले. पद या संज्ञेत मुख्यमंत्रिपद येत नाही काय? गोड बोलून यांनी आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला. पण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे.   
मी कधीच खोटे बोलणार नाही आणि खोटारडेपणाचा आरोप घेऊन तर शिवसैनिक आणि जनतेसमोर कधीच जाणार नाही. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. ते मला धक्का देणारे होते म्हणूनच मी स्वतः चर्चा थांबविली. भाजपला मी शत्रू मानत नाही पण त्यांनी खोटारडेपणाचा आरोप करू नये, असेही ते म्हणाले.
उदयनराजे, चौटालांची टीका कशी चालते?
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कधीच वैयक्तिक टीका केली नाही. धोरणात्मक बाबींवर निश्‍चितच बोललो पण वैयक्तिक कधीच बोललो नाही. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले काय बोलले होते मोदींबाबत? दुष्यंत चौटाला काय बोलले होते? ते चालते असे सांगताना दुष्यंत चौटाला यांच्या भाषणाच्या क्लिप देखील उद्धव ठाकरे यांनी दाखविल्या. युती करताना 124 जागा दिल्या ती अडचणही मी समजून घेतली. केंद्रात अवजड उद्योग हेच खाते पुन्हा दिले. मला अमित शहा यांनी खात्याबद्दल विचारले होते पण मी अमूक एक खाते द्या असे म्हटले नाही तर काम करायला कोणतेतरी चांगले खाते द्या असे म्हणालो होतो. पण पुन्हा एकदा तेच खाते शिवसेनेला देण्यात आले. सातार्‍याची लोकसभेची जागा देखील शिवसेनेच्या वाट्याची होती. पण यांनी परस्पर उदयनराजेंशी बोलणी करून ती जागा स्वतःकडे घेतली. तेव्हाही मी काही बोललो नाही. उलट 370 कलम रद्द केले तेव्हा मी मोदींचे जाहीर कौतुक केले. मिठाई वाटणारा मीच होतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्यात आणि मोदींमध्ये काडी घालण्याचा प्रकार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा जाहीर भाषणात माझा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. आमचे भावा-भावाचे नाते आहे. मोदींनी मला छोटा भाऊ म्हटल्यानंतर कोणाच्या तरी पोटात गोळा आला. आता या नात्यात काडी घालून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे महत्त्वाचे विधानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. उलट लोकसभेसाठी दोन हिंदुत्ववादी शक्ती एकत्र आल्याचा आनंदच मला होत होता. पण गंगा साफ करता-करता यांची मनेच कलुषित झाल्याचेही ते म्हणाले.
आमच्यासमोरीलही सर्व पर्याय खुले !
भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा, अन्यथा आमच्या समोरही सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा कशाच्या आधारे करत आहेत हे माहिती नाही. ते दावा करतात पण आम्ही पर्यायांचा विचार केला, की गुन्हेगार ठरतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा केल्याचा आरोप करतात. पण आम्ही लपून छपून काही करत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: