Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या खटल्यावर आज ऐतिहासिक निकाल
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) :  अवघ्या देशाचे लक्ष ज्या खटल्याकडे लागून राहिले आहे, त्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या (शनिवारी) आपला निकाल सुनावणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ शनिवारी सकाळी साडेदहापासून निकालाचे वाचन सुरू करणार आहे. दरम्यान, अयोध्या खटल्यावरील निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने सरकारकडून खबरदारी घेण्यात आली आहे. अयोध्येलाही पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद 106 वर्षे जुना आहे. ब्रिटिशकाळापासून या वादावर कोर्टकचेर्‍या सुरू आहेत. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय या प्रवासादरम्यान या वादाने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या निकाल देणार असल्याने त्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
6 ऑगस्टपासून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने अयोध्या खटल्यावर दररोज सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी घटनापीठाने अयोध्या प्रकरणी 17 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल व 17 नोव्हेंबरपर्यंत निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी अयोध्या खटल्याची सुनावणी पूर्ण करत घटनापीठाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल 4 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान कोणत्याही तारखेला दिला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता हा निकाल उद्याच दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- अलाहाबाद उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर 2010 रोजी अयोध्या खटल्यावर निकाल देत सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला विराजमान, अशा तीन पक्षकारांना एकूण वादग्रस्त भूखंडातून प्रत्येकी 2.77 एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देणार्‍या 14 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी झाली.
- अयोध्या खटल्याची सलग 40 दिवस सुनावणी चालली. सर्वोच्च न्यायालयात इतकी मॅरेथॉन सुनावणी झालेला हा दुसरा खटला ठरला. यापूर्वी केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार यांच्यातील खटल्याची सुनावणी 68 दिवस चालली होती.
- सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ अयोध्या खटल्याचा निकाल सुनावणार आहे. या घटनापीठात न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. अब्दुल नजीर यांचाही समावेश आहे.
पंतप्रधानांचे शांतता राखण्याचं आवाहन
अयोध्येचा निकाल उद्या येणार आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टिकोनातून पाहू नका. निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असे आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना केले.
सर्वोच्च न्यायालय  शनिवारी अयोध्या प्रकरणावर निर्णय देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी ट्विट करत देशातील जनतेला शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. अयोध्येवर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. गेल्या काही महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. न्यायालयाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे.  उद्या न्यायालयाकडून दिला जाणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, सद्भावना आणि एकता कायम राखणे ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. या परंपरेला आणखी बळ द्या, असे ट्विट मोदींनी केले आहे.
संयम राखा : फडणवीस
दरम्यान, अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील जनतेला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयात कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी विवादाचा निकाल उद्या अपेक्षित असून या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांनी ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येला छावणीचं स्वरूप; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी सकाळी साडे दहा वाजता लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अयोध्येला छावणीचे स्वरूप आले आहे तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांमध्येही अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर प्रदेशात 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सुरक्षेचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी राज्यात मोठा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणसी, प्रयागराज, आग्रा, मेरठ, लखनऊ, मथुरा, मुरादाबाद, गोरखपूर आणि अलीगडसहित सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या जिल्ह्यातील अधिकार्‍यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून संवेदनशील विभागात मोठा बंदोबस्त वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून पायी गस्त घातली जात आहे. जिल्हाधिकारी
धर्मगुरुंशी बैठका करत आहेत. गेल्या काही दिवसात शांततेसाठी सहा हजार बैठका घेतल्या असून 5800 धर्मगुरुंची भेट घेण्यात आली आहे. पोलिसांनी सैन्य आणि वायुसेनेशीही संपर्क ठेवला आहे. याशिवाय 12 हजार लोक पोलिसांच्या रडारवर आहेत. आतापर्यंत 500 लोकांना अटक करण्यात आली आहे. अयोध्येत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे 4 हजार जवान  तैनात करण्यात आले आहेत. गुप्तचर विभागही राज्यातील संदिग्ध हालचालींवर लक्ष ठेवून राहणार आहे. खासकरून अयोध्येत नाक्या नाक्यावर बॅरिकेड्स लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तीची आणि वाहनांची तपासणी केली जात आहे.
सोशल मीडियावर वॉच
अयोध्येत गस्त घालण्यासोबतच सर्वात जास्त नजर सोशल मीडियावर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक कामाला लावले आहे. आतापर्यंत 1659 अकाऊंट्स निगराणीत ठेवण्यात आले आहेत. शिवाय अगदीच गरज भासल्यास अयोध्येत इंटरनेट सेवाही बंद केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: