Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यातील शेतकरी सुखी व्हावा
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: mn5
5पंढरपूर, दि. 8 (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे  सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सौ. अंजली पाटील, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार वैशाली वाघमारे आदी उपस्थित होते.
 पाटील म्हणाले, ‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे. गेली तीन चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले.त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
बेडग गावचे ओमासे ठरले मानाचे वारकरी
मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे 2003 पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एस. टी. पासही देण्यात आला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: