Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राजकीय हालचालींना वेग, काँग्रेस-राष्ट्रवादीची खलबतं!
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : भाजप-सेनेचे बिनसल्याने निर्माण झालेल्या पेचामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तर पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली. राज्यपाल काय भूमिका घेतात ते पाहून पुढील पावलं टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
शिवसेना-भाजपत गेले 15 दिवस धुमसत असलेल्या संघर्षाचा आज अखेर स्फोट झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या पाठोपाठ घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व भाजपवर पलटवार केला.  
यामुळे युती फुटीच्या मार्गावर असून आता फक्त त्याची औपचारिक घोषणा शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धाव घेतली. पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेने दिला असल्याचे समजते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार यावर आम्ही अजूनही ठाम असल्याचे सांगितले.  शिवसेनेने कधीही भाजप नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. ज्यांनी भाजपचे वाभाडे काढले त्यांच्यासोबत भाजप नेते हरियाणात मांडीला मांडी लावून सत्तेत बसले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
दोन काँग्रेसची सबुरीची भूमिका !
सायंकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी उभय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. बैठकीत तातडीने काहीही न करता राज्यपाल पुढे काय भूमिका घेणार याकडे लक्ष ठेवावे व योग्यवेळी पुढचे पाऊल टाकावे, असे ठरवण्यात आले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी आम्ही राज्यपालांच्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून असून पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली असल्याने विधानसभेची मुदत संपल्यानंतर त्यांना काळजीवाहू सरकार म्हणून काम करता येते का याबाबत कायदेशीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतात, असे सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: