Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शद्ब कधीच दिला नव्हता!
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: mn1
मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर घणाघाती टीका, युतीबाबत अजूनही आशावादी!
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात येईल, असा शब्द कोणीही, कधीही दिला नव्हता. तरीही आमची चर्चेची तयारी होती. परंतु आमच्यापुढे अन्य पर्याय असल्याचे दावे करून शिवसेनेनेच चर्चेची दारं बंद केली. आपलेही फोन उद्धव ठाकरे यांनी घेतले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधी पक्षांनीही जितकी टीका केली नसेल तितकी शिवसेनेने केली. परंतु युती टिकावी म्हणून आजवर गप्प होतो, असे सांगत फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. मात्र शिवसेनेने आपली भाषा बदलली तर अजूनही चर्चा होऊ शकते, आम्ही युती तोडलेली नाही, असे स्पष्ट करताना राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
युतीतला संघर्ष संपण्याची आशा मावळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.     
त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कधीच दिला नव्हता. माझ्यासमोर कधीच हा विषय झाला नाही. मी अमित शहा यांनाही विचारले तेव्हा त्यांनीही असा काही विषय झाला नसल्याचेच स्पष्ट केले. तरीही यावर चर्चा होऊ शकली असती. परंतु मतमोजणी दिवशीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर आपल्यापुढे अन्य पर्याय उपलब्ध असल्याचे जाहीर केले. तरीही आपण चर्चेची दारं बंद केली नव्हती. अनेकदा मातोश्रीवर संपर्क साधण्यात आला. आपण स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन केले, परंतु त्यांनी फोन उचलले नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.
त्यांच्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मात्र चर्चेला वेळ होता !
महायुती म्हणून निवडणूक लढवलेली असताना व जनतेने स्पष्ट कौल दिलेला असताना मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा काढण्यात आला. त्यांच्याकडे आमच्याशी चर्चा करायला वेळ नव्हता. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिवसातून तीन-तीन वेळा भेटायला व चर्चा करायला वेळ होता, अशी टीका फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान मोदींवरील टीका सहन करणार नाही !
ज्यांच्यासोबत केंद्रात, राज्यातील सत्तेत सहभागी आहेत अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेनेने कायम टीका केली. विरोधी पक्षांची टीका एकवेळ समजू शकतो मात्र सोबतच्या मित्रपक्षानेच अशी टीका करणे सहन होऊ शकत नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे श्रद्धेय आहेत. त्यांच्यावर आम्ही कधीही टीका केली नाही. इतकेच काय पण विरोधात निवडणुका लढवून देखील उद्धव ठाकरे यांच्यावरही कधी टीका केली नाही. पण पाच वर्षांत तसेच निकालानंतर आता 13 दिवसात शिवसेनेने टीका करणे थांबविले नाही. आम्ही देखील त्याच भाषेत नाही तर त्याही पेक्षा तीव्र भाषेत टीका करू शकतो. पण आम्ही तसे करणार नाही. पण जर पंतप्रधान मोदींवर अशी टीका सुरूच राहणार असेल तर अशांसोबत सरकार कशाला चालवायचे हा प्रश्‍न आमच्या मनात येतो. आमच्या मनातील ही मोठी खंत आहे. त्यामुळे जर चर्चा करायचीच असेल तर हा विषय देखील चर्चेत यायला हवा. आमच्या मनातील ही खंत देखील दूर व्हायला हवी, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे आपले मित्र होते व आहेत, पण त्यांच्या भोवती असलेल्या लोकांमुळे हे घडल्याचे सांगत फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शिवसेना ज्या भाषेत बोलत आहेत, त्या भाषेत आम्हीही उत्तरं देऊ शकतो. मात्र आम्ही आमची मर्यादा कधीही ओलांडली नाही. शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची टीका विखारी होती. मात्र आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरेंबद्दल कधीही चुकीचे वक्तव्य केले नाही. बाळासाहेब आमच्यासाठी पूज्यनीय आहेत. तसेच उद्धव ठाकरेंवरही आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली
फोडाफोडीचे राजकारण करणार नाही !
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असला तरी राज्यपालांनी पुढची वैकल्पिक व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मलाच कारभार पाहायला सांगितले आहे. पण राज्यात पुढचे सरकार हे भाजपच्याच नेतृत्वाखाली बनणार हा ठाम विश्‍वास मला आहे. मात्र हे सरकार स्थापन करण्यासाठी भाजप कोणतेही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. काही लोक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आमदार फोडाफोडीचे खोटारडे आरोप करत आहेत. माझे त्यांना खुले आव्हान आहे की त्यांनी याबाबतचा एकतर पुरावा द्यावा किंवा माफी मागावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेनेने जनतेला वेठीस धरले आहे : मुनगंटीवार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व भाजपवर केलेले खोटारडेपणाचे आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले. तसेच जनतेला वेठीला धरण्याचे काम शिवसेनेने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावले. निकालानंतर अचानक पत्रकार परिषद घेऊन आमच्यासमोर पर्याय खुले आहेत, अशी जनतेला वेठीला धरण्याची घोषणा शिवसेनेने केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. महायुतीच्या जनादेशाचा अनादर करुन भाजपला खोटे ठरवण्याचे काम कोणी करु नये. सत्तेत राहून मोदी आणि शहा यांच्यावर आजपर्यंत कोणत्याही मित्र पक्षातील लोकांनी टीका केलेली नाही. मात्र, शिवसेनेने सातत्याने सत्तेत राहून त्यांच्यावर टीका केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: