Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा!
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजपत गेले पंधरा दिवस मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पुढील निर्णय होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे विभागले जावे, असा आग्रह शिवसेनेने धरल्याने सरकार स्थापनेत पेच निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीत युती करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समान विभागणी करण्याचा शब्द दिला गेला असून त्याचे पालन झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली होती. तर भाजपने असे काहीही ठरले नसल्याचे सांगत शिवसेनेची मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फुटत नव्हती. त्यामुळे तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला एक दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनावर जाऊन  मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावेळी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्यासोबत उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांना काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
राष्ट्रपती राजवट येणार?
विद्यमान विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी समाप्त होत असल्याने तोवर पुन्हा शपथ घेतली नाही तर फडणवीस यांना राजीनामा देणे भाग होते. एक दिवस आधीच त्यांनी राजीनामा देऊन टाकला असून आता पुढे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याने विधानसभा निवडणुकीत 105 जागा मिळवणारा भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यांच्या खालोखाल 56 आमदार असलेली शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. परंतु त्यांना जोवर राष्ट्रवादी काँग्रेस (54) आणि काँग्रेस (44) चा पाठिंबा मिळत नाही तोवर सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळणार नाही. त्यामुळे राज्यपाल किती काळ प्रतीक्षा करणार व राष्ट्रपती राजवट लागू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: