|
|
|
राज्याचे शस्त्रास्त्र धोरण 7 दिवसात तयार करा
PTI ---
Tuesday, February 09, 2010 AT 02:18 AM (IST)
मुंबई, दि. 8 ः राज्याचे शस्त्रास्त्र धोरण येत्या 7 दिवसात तयार करून या धोरणात दहशतवाद प्रतिबंधक, नक्षल प्रतिबंधक आणि कायदा सुव्यवस्था या तीन घटकांचा स्वतंत्रपणे विचार करावा, अशा सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नुकत्याच गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. गृहविभागाच्या शस्त्रास्त्र धोरणासंदर्भात गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर मुख्य सचिव श्रीमती चंद्रा अय्यंगार, प्रधान सचिव पी. के. जैन, पोलीस महासंचालक अनामी रॉय, पोलीस आयुक्त डी. शिवानंदन आदी अधिकारी उपस्थित होते. शासनाने शस्त्रास्त्रे व दारूगोळ्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला असून मिळालेल्या निधीतून तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे. येत्या 7 दिवसात राज्याचे हे धोरण तयार करून तातडीने अंमलबजावणी गरजेची आहे. शस्त्रे सुरक्षित ठेवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करून त्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यात येतील, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. संवेदनशील तुरुंगाचे सर्वेक्षण करून गरजेनुसार त्यांना स्वयंचलित रायफल उपलब्ध करून देण्याचे आदेशही गृहमंत्री पाटील यांनी दिले. वित्त विभाग सुरक्षेसाठी लागणारा निधी प्राधान्याने देत असून मिळालेला संपूर्ण निधी नियोजनबद्ध रितीने खर्च करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पोलिसांना जाहीर केलेली बक्षिसे आणि आहार भत्ते वेळेवर देणे आपली जबाबदारी आहे, असे सांगून थकीत आहारभत्ते तात्काळ वाटप करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले.
फोटो गॅलरी
|