Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

डॉ. विकास महात्मे
ऐक्य समूह
Saturday, February 27, 2010 AT 01:30 AM (IST)
Tags: vishesh lekh
 खाजगी रुग्णालयातले महागडे उपचार गोरगरीब आणि सामान्य रुग्णांना सध्या परवडण्यासारखे राहिलेले नाहीत. खाजगी रुग्णालयातला शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या प्रचंड खर्चामुळे, गरीब रुग्ण त्यासाठी तिकडे फिरकतही नाही. पण, याला डॉ. विकास महात्मे यांच्या धर्मादाय संस्थेचे नागपूरमधले नेत्र रुग्णालय मात्र अपवाद आहे. या रुग्णालयात गरीब, तळागाळातली आणि आदिवासी माणसेही डोळ्यावरच्या शस्त्रक्रियेसाठी येतात. बरी होवून परतही जातात. त्यांना या रुग्णालयाच्या फीची काही भीती वाटत नाही. कारण, गरीब रुग्णांच्या डोळ्यावर,  कितीही अवघड आणि खर्चिक असली तरीही ती पूर्णपणे मोफत होते, असा या नेत्र रुग्णालयाचा विदर्भात लौकिक आहे.
वैद्यकीय पदवी घेतल्यावर
डॉ. विकास महात्मे नागपूरच्याच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक झाले. पण, 1985 मध्ये त्यांना ही नोकरी सोडावी लागली. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हतीच. तरीही धीर न सोडता, रुग्णसेवा हेच ध्येय असलेल्या डॉ. महात्मे यांनी नागपूरच्या सेंट्रल एक्साईज कॉलनीत एका छोट्या खोलीत डोळ्यांचा दवाखाना सुरु केला.
डॉ. महात्मे म्हणजे देवमाणूस, अशी कीर्ती अल्पावधीतच झाल्यामुळे, रुग्णांच्या रांगा या दवाखान्याकडे लागल्या. खाजगी प्रॅक्टीस करून प्रचंड पैसा मिळवायचा हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. गोरगरीब रुग्णांचा अंध:कार दूर करणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेने डॉ. महात्मे यांनी आपला दवाखाना सांभाळत विदर्भातल्या दुर्गम भागापर्यंत जाऊन नेत्र रुग्णांची तपासणी करायला प्रारंभ केला. ज्या रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही केल्या. आपला डॉक्टर म्हणजे डॉ. महात्मे असे, आदिवासींनाही वाटते.
अवघ्या सहा खाटांचे नेत्र रुग्णालय त्यांनी प्रारंभी सुरु केले होेते. नेत्र यज्ञाच्या  विस्तारासाठी त्यांनी एस. एम. एम. आय. वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून, सोममळा विभागात सुसज्ज नेत्र रुग्णालय सुरु केले. या रुग्णालयाद्वारे त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव "पद्‌मश्री' पुरस्काराने झाला आहे. ज्यांच्या हस्ते त्यांचा हा गौरव होईल, त्या राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील याही डॉ. महात्मे यांच्या "नेत्रदान' यज्ञात सहभागी झाल्या आहेत. गेल्या पंचवीस वर्षात
डॉ. महात्मे यांनी सत्तर हजारांच्यावर नेत्रशस्त्रक्रिया केल्या. त्यातील तीस हजार शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या आहेत. त्यांच्या नेत्ररुग्णालयात अत्याधुनिक सुसज्ज वैद्यकीय उपकरणे तर आहेतच, पण याच रुग्णालयात पदव्युत्तर नेत्र अभ्यासक्रमांचेही प्रशिक्षण दिले जाते. मोतीबिंदू आणि अन्य विकारामुळे दृष्टी अधू झालेल्या, दृष्टी गमावलेल्या हजारो रुग्णांना डॉ. महात्मे यांनी दृष्टी दिली आहे. साडेसहा लाख नेत्ररुग्णांची तपासणीही केली आहे. विदर्भातल्या आदिवासी भागात ते आणि त्यांचे सहकारी दृष्टी गमावलेल्या नेत्र रुग्णांचा शोध घ्यायसाठी दुर्गम भागात फिरत असतात.
त्यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव अनेक पुरस्काराने झाला आहे. विदर्भ आणि मध्यप्रदेशातल्या बारा जिल्ह्यात डॉ. महात्मे यांचे हे नेत्र रुग्णसेवेचे कार्य अखंडपणे सुरु आहे. नेत्रपेढीद्वारे ते पूर्ण दृष्टी गेलेल्यांना दृष्टीदानही देत आहेत.  
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: