Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

शांततावाद्यांनी पेटवलेली दंगल
अभय अरविंद
Monday, March 01, 2010 AT 01:26 AM (IST)
Tags: Vishesh Lekh
 हरियाणा आणि पंजाब राज्यात प्रभाव असलेल्या डेरा सच्चा सौदा बाबा या पंथाच्या शांततावादी  अनुयायांनीच, या दोन्ही राज्यात जाळपोळ आणि दंगली कराव्यात, ही बाब या पंथाच्या प्रतिमेला डांबर फासणारी आहे. हरियाणातील  डेरा सच्चा सौदा बाबाचे प्रमुख गुरुमित राम रहिम यांच्यावर यापूर्वीच एका खुनाच्या प्रकरणी तपास सुरु आहे. वर्षापूर्वी डेरा सच्चा सौदा बाबा पंथाच्या पंजाबातल्या आश्रमावर शीख पंथियांनी हल्ले चढवले होते. तेव्हा गुरुमित रहिम यांनी, आपल्या अनुयायांना शांततेचे आवाहन केले होते. हा पंथही शांततेचाच आग्रही आहे. असे असतानाही रहिम यांच्यावर सीबीआयने फकिरचंद यांच्या खुनाच्या आरोपाखाली नवा गुन्हा नोंदवताच, डेरा सच्चा सौदा बाबाच्या अनुयायांनी पंजाब आणि हरियाणा राज्यात शनिवारी प्रचंड दंगल केली. आपल्या धर्मगुरुवर आकसाने आणि त्यांची बदनामी करायसाठीच असे आरोप ठेवले जात असल्याचे, या अनुयायांचे म्हणणे आहे.
सीबीआयच्या अंबाला न्यायालयात रहिम यांच्यावर हे नवे आरोपपत्र दाखल होताच, डेरा सच्चा सौदा बाबाचे हजारो अनुयायी रस्त्यावर उतरले. त्यांनी पंजाबातल्या मोगा, मानसा, लुधियाना, जालंधर, तरणतारण, बर्नाला या जिल्ह्यात दंगली केल्या. हरियाणातल्या शिरसा, कॅथल, फतेहबाद या जिल्ह्यातही हिंसाचारी आंदोलन केले. दंगल खोरांनी बर्नाळा येथील रेल्वे स्टेशन जाळून टाकले. मोगा शहरात चार बसगाड्या जाळल्या. हरियाणात रेल्वे गाड्यांचे सहा डबे जाळून टाकले. या संतप्त जमावाने पंचवीस बसगाड्या पेटवल्या, दुकानांना आगी लावल्या. वाहतूक बंद पाडली. या अनावर जमावाला पांगवायसाठी पोलिसांनी लाठीमार करताच, निदर्शकांनी त्यांच्यावरच जोरदार दगडफेकही केली. संपूर्ण दिवसभर डेरा सच्चा सौदा बाबाच्या हजारो अनुयायांनी या दोन्ही राज्यातल्या जनतेला आपल्या दावणीला बांधलेले होते. त्यांनी अचानक सुरु केलेल्या या हिंसक आंदोलनामुळे जनजीवन ठप्प झाले. वातावरणातही तणाव निर्माण झाला. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची राख रांगोळी झाली. आपल्या धर्मगुरुंनी सांगितलेल्या शांततेच्या शिकवणुकीचा विसर पडलेले हे लोक रस्त्या-रस्त्यात धिंगाणा घालीत फिरत होते. या जमावाला पोलिसांनी आवर घालायचा प्रयत्न केला तेव्हा पिसाटल्यासारख्या या लोकांनी बसगाड्यांची पेटवा-पेटवी केली.
धर्मगुरु रहिम हे पूर्णपणे निर्दोष असतील तर, न्यायालयात ते सिध्दही होईल. पण, न्यायालयीन सुनावणीच्या आधीच, ते निर्दोष असल्याचा डंका पिटीत, सर्वसामान्य जनतेला वेठीला धरायचे, डेराच्या अनुयायांना काहीही कारण नाही. अनुयायांच्या या असल्या आंदोलनामुळे आपल्या पंथाचीही बदनामी होत आहे, याचे भान त्यांना नाही. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी पंजाबच्या  जनतेला आणि डेराच्या अनुयायांना शांततेचे आवाहन केले असले तरी, अद्यापही या दंगलीचे पडसाद उमटतच आहेत. धार्मिक भावना दुखावल्याच्या नावाखाली, शांततेला चूड लावित कायद्याला आव्हान देत हिंसक आंदोलने करणाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: