जम्मू-काश्मीर
ऐक्य समूह
Tuesday, March 02, 2010 AT 10:25 PM (IST)
पाकिस्तानच्या तालावर नाचणाऱ्या हुर्रियत परिषदेने काहीही झाले, तरी काश्मीर खोऱ्यात कायमस्वरुपी शांतता नांदू द्यायची नाही, असा निर्धारच केला आहे. काश्मीर खोऱ्यात कुणी आत्महत्या केली, तरी त्याचे खापर पोलीस आणि सुरक्षा दलावर फोडून हुर्रियत परिषद आंदोलनाचा नारा देते. गेल्या दोन वर्षात काश्मीर खोऱ्यात येणाऱ्या देश विदेशातून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटकांच्यामुळे सामान्य जनतेला आणि व्यापाऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळू लागले होते. पण, हुर्रियत परिषदेला सामान्यांच्या सुख दु:खाशी काही देणे घेणे नाही. पर्यटन हाच व्यवसाय असलेल्या काश्मीर खोऱ्यातल्या जनतेवर हुर्रियतच्या सततच्या आंदोलनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. पण, या संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, तर काही समाजकंटक आपल्या दुकानांची नासधूस करतील, अशी भीती व्यावसायिकांना वाटते. या भीतीपोटी हे लोक हुर्रियतच्या बंदमध्ये सामिल होतात. गेल्या सहा महिन्यात या भागात तीस वेळा हुर्रियतने बंद आणि हरताळाचे आदेश देवून सामान्य जनजीवन वारंवार विस्कळीत
केले आहे.
राजधानी श्रीनगरपासून पन्नास किलोमीटरवर असलेल्या सोपोर जिल्ह्यातील चिंकीपोरा या गावात घुसलेल्या दहशतवाद्याशी सुरक्षा दलांची चार दिवस चकमक झाली. दहशतवाद्यांना कंठस्नान घालायच्या या मोहिमेत गावातल्या काही घरांचे नुकसान झाले. ते भरून द्यायचे आश्वासनही राज्य सरकारने दिले असतानाही हुर्रियतचे नेते सैद शहा गिलानी यांनी सोपोर मधल्या चकमकीच्या निषेधार्थ काश्मीर खोरे बंदचा फतवा काढला. या आदेशाला श्रीनगर शहरासह या भागात चांगला प्रतिसादही मिळाला. बंदच्या काळात बंदोबस्त करणाऱ्या पोलीस आणि सुरक्षा दलांच्या तुकड्यांवर तुफानी दगडफेक करणाऱ्यांची टोळकीच आता काश्मीरमध्ये निर्माण झाली आहेत. या टोळ्यांना पोलिसांवर दगडफेक करायसाठी पाकिस्तानातून पैशाचाही पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आता अधिक कडक धोरण स्वीकारून या टोळक्यांना गजाआड करायची मोहीम सुरु केली आहे. त्यांच्यातल्या एका म्होरक्याला पोलिसांनी अलीकडेच पकडले, तेव्हा त्याच्या बॅंक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे आढळले. काही तरुणांना दगडफेकीचे विशेष प्रशिक्षणही दिले जात असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.
बंदच्या काळात अशी दगडफेक आणि हिंसाचार होवू नये, यासाठी पोलिसांनी बंदी आदेश लागू करून, समाजकंटकांना पकडायची जोरदार मोहीम सुरु केली आहे. त्यामुळेच सैद गिलानी आणखी भडकले. निरपराध तरुणांवर पोलीस अत्याचार करतात, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी केली. सरकारचा उठसूठ निषेध करणारे गिलानी दहशतवाद्यांच्याकडून जनतेवर होणारे अत्याचार आणि हत्याकांडाबाबत मात्र निषेधाचा एकही शब्द कधी काढत नाहीत. ते पाकिस्तानच्या आदेशानुसार नाचतात, हे काश्मिरी जनतेच्याही लक्षात आले आहे. पण, पिसाळलेल्या गिलानींना आवरणार कोण? हीच खरी समस्या आहे.