अशीही एक शोकांतिका
- सुहास साळुंखे
Thursday, March 04, 2010 AT 11:49 PM (IST)
प्रमोद महाजन यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी प्रवीण महाजनला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ब्रेन हॅमरेजच्या तीन महिन्यांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळेे महाजन कुटुंबियांची शोकांतिका नव्याने जगापुढे आली. द्वेष, मत्सर आणि हिंसेने केलेल्या कृत्याचा परिणाम केवळ कृत्य करणाराच भोगत नाही तर अनेक निरपराधांनाही भोगावा लागतो, हे या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.
प्रमोद महाजन यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रवीण महाजन याचे निधन झाले. ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये प्रवीण भरती होता. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला, असे निदान डॉक्टरांनी केले आहे. खरे तर प्रमोद महाजन यांच्या निधनाच्या दिवशीच महाजन कुटुंब एका द्वेषाच्या अग्नीत संपल्यात जमा होते. आपल्या सख्या, थोरल्या भावावर निर्दयीपणे गोळ्या झाडून त्याचा अंत करणारा प्रवीण महाजन नक्की कसा होता असा प्रश्न पडत असला तरी त्याच्या रूपाने महाजन कुटुंबियांची शोकांतिका जगापुढे आली. पैशावरून प्रवीणने प्रमोद महाजन यांची हत्या केली असाच निष्कर्ष या खटल्यातून निघतो. उड्डाणटप्पू आणि भावाच्या पैशावर आनंदात राहणारा प्रवीण महाजन कुटुंबियांना आजही एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे वाटत असेल. खरे तर त्याच्या मृत्यूने प्रकाश महाजन यांची मन:स्थिती कशी असेल हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. एकीकडे भावानेच भावाचा खून करून त्याचे अस्तित्व संपवले होते. तुरुंगात असतानाही आरोपी म्हणून का होईना, भाऊ अस्तित्वात होता. आज प्रकाश महाजन यांना जगरहाटीप्रमाणे प्रवीणलाही भाऊ समजावे लागत असून रीती-रिवाजाची कर्मकांडे पार पाडावी लागतील. हे
वास्तव बंधुत्वाच्या भूमिकेतून पाहता वेदनादायक ठरते.
कुटुंबाचा तारणहार
प्रवीण महाजनने 22 एप्रिल 2006 रोजी प्रमोद महाजनांवर त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडल्या होत्या. 13 दिवस मृत्यूशी झुंजून अखेरीस प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर महाजन कुटुंबियांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. मराठवाड्यातील एका छोट्या गावातून स्वत:च्या हिमतीवर राष्ट्रीय पातळीवर नाव कमावणाऱ्या प्रमोद महाजनांचे अस्तित्व केवळ कुटुंबियांसाठीच महत्त्वाचे नव्हते, तर भारतीय जनता पक्षासाठीही अनन्यसाधारण होते. निवडणुका जिंकण्याच्या आणि त्यासाठी व्यूहरचना करण्याच्या नियोजनात प्रमोद महाजन यांचा हातखंडा होता. पक्षासाठी कार्यकर्त्यांची फळी राबवणे आणि त्याचबरोबर पक्षाची आर्थिक वंचना दूर करणे असे काम ते एकाच वेळी करत असत. एकीकडे क्लासलीडर तर दुसरीकडे मासलीडर असा त्यांचा लौकिक होता. त्यांच्या मृत्यूमुळे भारतीय जनता पक्षाला धक्का बसला. या पक्षीय पातळीवरच्या बाबी बाजूला ठेवल्या तर महाजन कुटुंबियांमध्येही या घटनेमुळे फूट घडली हे मान्य करावे लागेल. प्रमोद महाजनांचे कुटुंब, त्यांची आई तसेच त्यांचे बंधू प्रकाश महाजन हे एका बाजूला तर प्रवीण महाजन आणि त्यांची पत्नी सारंगी एका बाजूला अशी विभागणी झाली होती.
प्रवीणबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच्या एककल्ली, हेकेखोर स्वभावाच्या कहाण्याही बाहेर आल्या होत्या. प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या खटल्यातून त्याच्या स्वभावाचे विविध पैलू उघड होऊ लागले होते. गोपीनाथ मुंडे, पूनम महाजन, प्रकाश महाजन यांनी न्यायालयासमोर दिलेल्या साक्षीतून त्याच्या स्वभावाचा परिचय होत होता. अखेरीस त्याला नाशिक येथील तुरुंगात ठेवण्यात आले. निकालानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 28 नोव्हेंबर 2009 रोजी तो पॅरोलवर सुटला होता. 13 डिसेंबर 2009 रोजी त्याला नाशिक जेलला रवाना व्हायचे होते. परंतु, एकच दिवस आधी म्हणजे 12 डिसेंबरला त्याला ब्रेन हॅमरेजचा झटका आला. तो कोमात गेला आणि अखेरपर्यंत कोमातच होता.
प्रमोदबद्दल असूया
प्रवीणचे राहणीमान, त्याचे उद्योग-धंदे याबद्दल माध्यमातून बरीच चर्चा झाली. तो प्रमोद महाजनांच्या नावाचा वापर करत असे. प्रमोद महाजन यांनी त्याला उद्योग-व्यवसाय काढून दिले होते. मात्र, श्रीमंत होण्याची हाव त्याला कोणत्याही एका धंद्यात स्थिरावू देत नव्हती. एका बाजूला प्रमोद महाजन यांच्याबद्दल मनात सुप्त असुया होती. तुरुंगात असताना त्याने "माझा आल्बम' हे आठवणींचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामध्ये प्रमोद महाजन यांच्याबद्दल असणारी ही असुया स्पष्ट होते. प्रमोद महाजन यांना सत्ता, पैसा आणि स्त्रियांबद्दल आसक्ती होती, असे विधानही त्याने त्या पुस्तकात केले होते. प्रमोद महाजन यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम या पुस्तकाने केले. त्याचबरोबर काही ठिकाणी त्याने प्रमोद महाजनांबद्दल कृतज्ञतापूर्ण उल्लेखही केला होता. त्याच्या या मानसिक परिस्थितीचा अंदाज त्याचा त्यालाच आला होता की नाही हे आता न सुटणारे कोडे आहे.
प्रवीण महाजनने प्रवीणची निंदा करून सहानुभूती मिळवायचा केलेला प्रयत्न पूर्णपणे फसला. मरणांती वैरानी असं सुभाषित आहे. त्याचाही प्रमोदच्या द्वेषाने पछाडलेल्या प्रवीणला विसर पडला. कोणत्याही मार्गाने प्रसिध्दी मिळवायची असं तुरुंगात असतानाही त्याला वाटायला लागलं. प्रमोदचा खून त्यानं केला तेव्हा प्रवीण महाजनच्या कुटुंबाशी आपले संबंध कायमचे संपले असं प्रमोदचे बंधू प्रकाश महाजन यांनी जाहीर केलं होतं. त्याच्यावर खटला सुरु असताना महाजन कुटुंबाने त्याला काहीही मदत केली नाही. प्रवीणची पत्नी सारंगी मात्र या साऱ्या आवर्तात आपल्या पतीच्या पाठीशी उभी होती. प्रवीण जामिनावर सुटून घरी आला. सारंगी आणि प्रवीणच्या मुलांनी दिवाळी साजरी केली. पण, ही रजा संपल्यावर तुरुंगात जायच्या आधी चारच दिवस प्रवीणला मेंदूतला रक्तस्त्राव झाला. ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं. या खाजगी रुग्णालयातला उपचारांचा खर्च महागडा असल्यामुळं सारंगीनं हा खर्च सरकारनं द्यावा, अशी मागणीही केली होती. पण, प्रवीणच्या मृत्यूच्या आधी दोनच दिवस सरकारनं खाजगी रुग्णालयाचा खर्च आम्ही देणार नाही, असं सांगून टाकलं. आता या हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च सारंगी आणि तिच्या कुटुंबियांनाच भरावा लागणार आहे. प्रवीणनं प्रमोदला खलास केलं. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आपल्या पत्नीला प्रचंड मानसिक त्रास दिला. महाजन कुटुंबाची बदनामी झाली. या सूडाच्या अग्नीनं दोन कुटुंबं पुरती होरपळली गेली. जाता जाताही प्रविीणनं आपल्या पत्नीला प्रचंड आर्थिक खर्चात लोटलं. आता यापुढं तिला आपलं सारं आयुष्य वैधव्यात जगताना खुन्याची पत्नी आणि मुलांना खुन्याची मुलं हा कलंक लागवीतच आयुष्य काढावं लागणार आहे. प्रमोद महाजन सुसंस्कृत होते. पण त्यांचा दिवटा मुलगा राहुल मात्र घराण्याच्या कीर्तीला डांबर फासणारा निघाला. चरस, गांजाचं व्यसन असल्याचे आरोप त्याच्यावर झाले. त्याच्या भंपकपणाला कंटाळून लग्न झाल्यावर काही महिन्यातच त्याची पत्नी त्याला घटस्फोट देवून निघून गेली. मध्यंंतरी बीग बॉसमध्ये सामिल झालेल्या या पोरट्यानं नको ते चाळे नट्यांशी केले. त्याचं सारं प्रक्षेपण उपग्रह वाहिनीवर झालं. त्याच्याबद्दल कसलीही सहानुभूती लोकांना वाटत नाही. हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण त्यानं आपल्या कृत्यानं खरी करून दाखवली आहे.
भाऊबंदकीचा शाप
भाऊबंदकी हा भारतीय संस्कृतीला असलेला शाप आहे. महाभारतातील भाऊबंदकीने कौरव आणि पांडव या दोन्ही कुळांचा सर्वनाश केला. सत्तेवरून निर्माण झालेली द्वेषाची भावना पराकोटीला गेल्यावर हातात उरते ते केवळ पोकळ शून्यच. त्यानंतरही आपल्याला यासंदर्भात इतिहासातील अनेक दाखले देता येतील. पेशवाई असो वा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या प्रयत्नात खो घालणारे भाऊबंद, ही सर्वच उदाहरणे अनादी काळापासून प्रवीण महाजन यांच्यापर्यंत सारखीच वाटतात. प्रवीण महाजन याने प्रमोद महाजन यांची हत्या करून काय मिळवले ? जे मिळवायचे होते ते त्याला अखेरच्या श्वासापर्यंत मिळवता आले नाही. परंतु, एका कुटुंबाची आणि एकाच नव्हे तर तीन कुटुंबांची वाताहत करण्याचे पातक त्याच्या माथी आले. एकीकडे स्वत:चा संसार उद्ध्वस्त झाला आहे. प्रमोद महाजन यांचा संसार त्याने उद्ध्वस्त केला आहे तर म्हातारपणी आईला जे बघायला लागू नये ते दाखवण्याचे चुकीचे कृत्य त्याने केले आहे. द्वेषाने केलेल्या कोणत्याही कृतीतून चांगुलपणा निर्माण होत नाही. प्रेम वाटले तर द्विगुणित होते हा जुना सिद्धांन्त महाजनांच्या या दुर्दैवी घटनांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. राहुल महाजन याचे 6 मार्च रोजी वाहिनी प्रायोजित स्वयंवर आहे. ते झाल्यावर या दोन्ही कुटुंबातले संबंध संपुष्टात आले का, या आणि अशा प्रश्नांच्या चर्चांना आता ऊत आला आहे. परंतु, अविचाराने आणि हिंसेने संपूर्ण घरदार पोळू शकते हे महाजन कुटुंबियांच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे.
- सुहास साळुंखे