प्रवाही ज्ञान
ऐक्य समूह
Friday, March 05, 2010 AT 01:02 AM (IST)
तुमचा हात गोरापान आहे, त्यातील रक्त अगदी शुध्द आहे, परंतु जर मनगटावर गच्च पट्टी बांधली तर हातातील रक्त हातातच राहील. शरीराच्या इतर भागात ते खेळावयाचे नाही व ते लवकरच नासून जाईल आणि हात सुकून जाईल. त्याचप्रमाणे जो देश आम्हीच मोठे आहोत, आम्ही चांगले आहोत, आम्ही थोर आहोत, आम्हाला म्लेच्छांशी व काफिरांशी संबंध ठेवण्याची काय जरुरी आहे? असे म्हणून स्वत:ला इतरांपासून अलग ठेवतो, तो स्वत:वर पट्टी बांधून घेतो व स्वत:ला आपण होऊन कृश करून घेतो. "वाहते पाणी स्वच्छ असते, साठलेले पाणी गलिच्छ असते,' ही म्हण प्रसिध्दच आहे.
"पाणी समुद्राकडे वाहते राहील तरच ते चांगले'.
"मनुष्य देशाटन करील तरच तो चांगला.'
विचार करून पाहता असे दिसून येईल की, कोणत्याही देशाने आपली उन्नती करून घेतली आहे ती प्रवासानेच. यासंबंधी अमेरिकन लोकांची गोष्ट पाहा. साधारणपणे पंचेचाळीस हजार अमेरिकन लोक पॅरिस शहरात रोज असतात. त्यांच्या झुंडीच्या झुंडी येत असतात व फ्रान्समध्ये जरा काही नवीन कला निघाली की, चटदिशी ते आपल्या देशाला पोहोचवतात. जुन्या कला शिकण्यासही ते कमी करतात असे नाही. प्रत्येक मोसमात सुमारे ऐंशी हजार अमेरिकन लोक मिसर देशात जातात व तेथील मनोरे पाहून घेतात. शेकडा चाळीस लोक सर्व पृथ्वी फिरून आले आहेत. या रीतीने हे लोक जेथे ज्ञान मिळेल तेथून ते आणून आपल्या देशाला पोहोचवितात. जर्मन लोकांची गोष्टही अशीच आहे. अमेरिकेहून येताना "राम' जर्मन जहाजात बसला होता. पहिल्या वर्गाचे उतारू सुमारे तीनशे होते. त्यामध्ये प्रोफेसर सर ड्यूक, बॅरन, व्यापारी वगैरे लोक होते. दिवसा "राम' जहाजाच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन बसत असे व तेथे एकांतामध्ये बसून लिहित वाचीत असे, अथवा ध्यानामध्ये मग्न असे, पंरतु जर्मन लोक वरच्या मजल्यावर येऊन "रामा'ला खाली घेऊन येत व त्याला व्याख्यान द्यावयास लावीत.