मूठभर बोरे
ऐक्य समूह
Saturday, March 06, 2010 AT 12:54 AM (IST)
एका बोरीच्या रानात एका म्हातारीने बरीच बोरे गोळा केली. ती एका लहान तोंडाच्या घागरीत ठेवून म्हातारी आणखी बोरे आणण्यासाठी पुन्हा इकडे तिकडे फिरू लागली. तिने घागरीत बोरे ठेवलेली एका माकडाने पाहिले होते. म्हातारी दूर गेलेली पाहून माकड हळूच घागरीजवळ गेले व त्याने बोरे पळविण्यासाठी घागरीत हात घातला. बचकभर बोरे हातात घेऊन ते पळणार होते पण हातात बोरे असल्याने त्या घागरीतून बोरांसकट त्याला हात बाहेर काढता येईना. हातातील बोरे सोडून देण्याचेही माकडाच्या जिवावर आले.
हातात बोरे ठेवूनच माकड आपला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. आता आपण अडकलो या कल्पनेने माकड जोरजोरात ओरडू लागले. ते ऐकून म्हातारी घागरीकडे परत आली. तिने आपल्या हातातील काठीने माकडाला दोन-चार रट्टे लगावले. गडबडीत माकडाच्या हातून बोरे सुटली व त्याचा हात बाहेर निघाला. हात मोकळा होताच माकड जीव घेवून पळून गेले. त्याला पळून जाताना पाहून म्हातारी म्हणाली, "मूठभर बोरापायी मुर्खाला चार रट्टे मात्र मिळाले।'
तात्पर्य : साध्या साध्या गोष्टींच्या मोहापायी मोठी संकटे मात्र ओढवतात.