Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

डॉ. एन. जे. पवार
ऐक्य समूह
Saturday, March 06, 2010 AT 12:48 AM (IST)
Tags: vishesh lekh
 सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातले ऐनावडे हे आडवळणी गाव! या गावातल्या नामदेव जगन्नाथ पवार या विद्यार्थ्याने खूप शिकायचा निर्धार केला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. घरात शैक्षणिक वातावरण नव्हतेच. पण, या शेतकरी कुटुंबातला हा मुलगा गावातल्याच शाळेत शिकून पुढे शिवाजी विद्यापीठातून बी. एस्सी.  आणि एम. एस्सी.  गुणवत्तेसह उत्तीर्ण झाला. पुणे विद्यापीठातून या विद्यार्थ्याने भूगर्भशास्त्रातली पीएच. डी. पदवीही संपादन केली. याच विद्यापीठात ते भूगर्भशास्त्र विभागप्रमुखही परवापर्यंत काम करीत होते. आता ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु झाले आहेत.
शिवाजी विद्यापीठाचाच विद्यार्थी खूप शिकून, याच विद्यापीठाच्या कुलगुरु पदापर्यंत पोहोचावा ही घटना, विद्यापीठाच्या उच्च शैक्षणिक परंपरेचा बहुमान होय. 35 वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठ म्हणजे कमी दर्जाचे, असा गैरसमज काही हितसंबंधियांनी पसरवला होता. या विद्यापीठाच्या पदवीधरांनी अर्ज करू नयेत, असेही जाहिरातीत लिहिलेले असे. पण, याच विद्यापीठाच्या गुणी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या मुद्रा उमटवल्या आणि हे विद्यापीठ जागतिक दर्जाचे शिक्षण देणारे असल्याचे सिध्दही करून दाखवले.
विद्यापीठाच्या कुलगुरु पदाची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. एन. जे. पवार, यांनी जागतिक शिक्षणाच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठ अद्यावत शिक्षणाचे महाद्वार होईल, याचसाठी आपण प्रयत्न करू. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कृषी, अर्थ आणि विज्ञान क्षेत्रातल्या नव्या संधी मिळवून देवू, संशोधनाचे क्षेत्रही खुले करू, अशी ग्वाही दिली आहे.
डॉ. पवार यांना आपल्या गावाचा, भागाचा, शाळेचा आणि विद्यापीठाचाही विलक्षण अभिमान आहे. नोकरी निमित्त ते बाहेर होते, तरीही त्यांची मातीची नाळ तुटली नव्हती. ही माती आणि मातीतल्या माणसाबद्दल त्यांना अपार जिव्हाळा आहे. आपण ग्रामीण भागातले आहोत, असेही ते आवर्जून सांगतात.
पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना शिकवताना आणि संशोधनासाठी मार्गदर्शन करताना, त्यांचे अथक संशोधन सुरुच होते. भू शास्त्र, भू जल शास्त्र, पर्यावरणीय भू रसायन शास्त्र या विषयाचा त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. ब्रिटिश कौन्सिलची त्यांना दोन वेळा संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. भारतीय सायन्स कॉंग्रेसने "युवा शास्त्रज्ञ' पुरस्काराने त्यांना गौरवले होते. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचे ते तांत्रिक सल्लागारही होते.
भूशास्त्राच्या नव्या शाखात संशोधन करणाऱ्या डॉ. पवार यांनी आपल्या विद्यार्थ्यांनाही नव्या क्षेत्रात संशोधन करायसाठी सतत मार्गदर्शन केले आहे. पुणे विद्यापीठात शिकवत असताना रात्री गाडी चालवून पैसे कमावणाऱ्या आणि दिवसा एम. एस्सी. च्या वर्गांत बसून शिकणाऱ्या घुमटकर आणि अन्य विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या डॉ. पवार यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांबद्दल अधिकच ओढ आहे. आपल्या कुलगुरु पदाच्या कारकिर्दीत आपण अशाच घुमटकर सारख्या विद्यार्थ्यांना शोधू, त्यांना मानसिक आधार देवू, पुढे
जाण्याची जिद्द देवू, असे त्यांनी सांगितले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: