Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

गोकुळ दुधाची चोरी करणारा "महाबोका' कोण?
राजीव वाबळे
Saturday, March 06, 2010 AT 12:51 AM (IST)
Tags: stambha lekh
वार्षिक सातशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात "गोकुळ' मध्ये संघामध्ये काही चांगल्या बाजू, प्रवृत्तींच्या बरोबर काही वाईट, काळ्या बाजूंचाही शिरकाव झाला आहे. संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर व महाव्यवस्थापक आर. सी. शहा यांनी गोकुळ दूध चोरी आणि भेसळीचे मोठे प्रकरण उघडकीस आणले. आता जनमानसातील गोकुळची प्रतिमा मलिन होवू नये, यासाठी गोकुळ दुधाची चोरी करणारा "महाबोका' कोण याचा कसून शोध घेणे अपरिहार्य आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा मिळावा, त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण व्हावे आणि दुधाची गुणवत्ता आणि दर्जाच्या बाबतीत नामवंत असलेल्या या जिल्ह्यात दुग्धक्रांती व्हावी या ध्येयाने सहकारातील जाणकार असलेल्या नारायणराव सरनाईक यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना केली. संघाचा पाया मजबूत केला. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या विविध योजना, "दुधाचा महापूर' या योजनांचा फायदा मिळवून प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषवलेल्या आनंदराव पाटील चुयेकर यांनी एकाकी, अलिप्तपणा राखत संघाला सुस्थितीवर चढत्या क्रमाने नेत दुग्ध उत्पादक आणि व्यवसायाचे मंदिर उभारले. त्यावर सुवर्णकळस उभारण्याची महत्तम कामगिरी खिलाडूवृत्ती, अभ्यासू, कृषी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी संपादन केलेले, व्यापक जनसंपर्क अनेक वर्षे सलग अध्यक्षपद भूषवलेल्या अरुण नरके यांनी बजावली. इतकेच नव्हे तर प्रारंभापासून काहीसा अलिप्त असणारा संघ जनमानसात आणण्याची तसेच दर्जेदार आणि सकस असणारी गोकुळची दुग्धजन्य पदार्थांची उत्पादने सर्वदूर लोकप्रिय आणि सर्वतोमुखी करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यानंतर अध्यक्षपदी आलेल्या रणजितसिंह पाटील, विश्वास ना. पाटील, राजकुमार हत्तरकी व विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी संघाची चढत्या क्रमाने प्रगती करण्याची परंपरा आजतागायत कायम राखली. दूध संघाची सध्याची वार्षिक उलाढाल 748 कोटी रुपयांची असून निव्वळ नफा 5.41 कोटी रुपये इतका आहे. रिझर्व्ह फंड 13.15 कोटी आणि इतर फंड 21.18 कोटी रुपये अशी संघाची भरभक्कम आर्थिक बाजू आहे. प्राथमिक दूध संस्था आणि दूध उत्पादकांना विविध सोई, सुविधा, सवलती पुरवत आणि दुधाला बऱ्यापैकी दर देत त्यांच्या हिताचा कारभार संचालक मंडळाने केला आहे.
संचालकपदासाठी अट्टाहास
गोकूळने नेत्रदीपक कामगिरीचा वेग कायम ठेवल्याने त्याच्याकडे जिल्ह्यामधील बड्या धेंडांचे, राजकारण्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. येथील संचालकांना मिळणारे भत्ते आणि इतर सवलती पाहून "आमदारकी नको पण गोकुळचे संचालक करा' अशी जाहीर मागणी करण्यापर्यंतची मजल प्रतिष्ठित राजकारण्यांची गेलेली आहे. या संघाच्या महिला गटातील संचालिका म्हणून माजी आमदार स्व. संजयसिंह गायकवाड यांच्या पत्नी आणि काही काळ स्वत: आमदार असलेल्या श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड यांनी काम पाहिले. सध्या माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मातोश्री सौ.अनुराधा बाबासाहेब पाटील सरुडकर आणि कागलचे माजी आमदार संजय (बाबा) घाटगे यांच्या पत्नी आणि कागल पंचायत समितीचे सभापती अमरिश घाटगे यांच्या मातोश्री सौ. अरुंधती संजय घाटगे या महिला संचालिका आहेत. माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील आणि माजी आमदार बजरंग देसाई यांना आपले पुत्र दीपक भरमू पाटील आणि धैर्यशील बजरंग देसाई यांना गोकुळचे संचालकपदी "वर्णी' लावण्याचा "मोह' आवरता आला नाही. बहुतेक संचालक हे ज्येष्ठ राजकीय नेत्यांचे आप्त, संबंधित, कार्यकर्ते हेच आहेत. गोकुळच्या संचालकांची "सर्व कमाई' जिल्ह्यातील जनतेच्या डोळ्यात भरणारी आणि चर्चेमध्ये असणारी अशीच सातत्याने राहिलेली आहे. सानुग्रह अनुदानासह प्रतिवर्षी मिळणारा बोनस, अन्य सोई सुविधा आणि मासिक बडा पगार यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची "चांदी' झालेली आहे. महत्वाच्या वजनदार संचालकांच्या गळ्यातील "ताईत' म्हणून भासवणाऱ्या काही अधिकाऱ्यांचा थाटमाट, ऐश्वर्य हे देखील सर्वसामान्यांच्या चर्चेमध्ये सतत असते. थोडक्यात सर्वांनी मिळून "जावू तेथे खावू' या न्यायाने "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' हे वचन शंभर टक्के कृतिशीलपणे राबवलेले आहे. काही चांगल्या बरोबर अनेक अपप्रवृत्ती, संधिसाधू यांचा शिरकाव झालेला आहे. कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी काही वर्षांपूर्वी स्वत: दुग्धविकास राज्यमंत्री असताना गोकुळ दूध संघातील गैरव्यवहार, उधळपट्टी आणि अपप्रवृत्तीविरुध्द आघाडी उघडून, जाहीर आरोप करून, त्यांची चौकशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत केली होती. चौकशीअंती गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त होण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. मात्र अखेरच्या आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी "मेहरनजर' दाखवल्याने संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई व बदनामी टळली. इतकेच काय पण आयकर खात्याने एकाच वेळी सर्व संचालकांच्या निवासस्थानी धाडी टाकून बेहिशोबी मालमत्ता, संबंधित कागदपत्रे जप्त केली होती. तिचे पुढे काय झाले ते "गुलदस्त्यात' आहे. मात्र ही घटना गोकुळच्या संचालकांचे "पितळ उघडे' करणारी ठरली.
दुधाची चोरी
नुकतेच माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील यांना "गोकुळच्या' दुधाची टॅंकरमधून चोरी होवून त्यामध्ये भेसळ होते' अशी माहिती मिळाली. ते त्यांचे बंधू आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील त्यांचे सहकारी आणि गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शहा यांनी पाळत ठेवून पुणे-बंगलोर महामार्गावरील हुक्केरी तालुक्यातील कलंगणा येथे गोकुळच्या दुधाच्या टॅंकरमधून दुधाची चोरी होत असताना आणि दुधात पाणी मिसळले जात असताना टॅंकरवरील बाळासाहेब कुटकोळे आणि चालक संजय सुभाना कडाकणे यांना "रंगेहात' पकडले मात्र मुख्य सूत्रधार शिवा संकेश्वरी, आनंदा माळी, शिवा वंटमोरे हे तिघेजण पळून गेले. कणंगला येथे एक दुधाचा टॅंकर पकडला गेल्याची माहिती मिळताच दुधाने रिकामा केलेला एक टॅंकर मुख्य दूध शीतकरण केंद्रावर सोडून चालकाने पलायन केले तर एक दुधाने भरलेला टॅंकर जवळच्या हॉटेल जयहिंद धाब्याच्या आवारात सोडून चालक पळून गेला. या दोन्ही टॅंकरमधून दुधाची चोरी आणि भेसळ होत होती अशी चर्चा आहे.
दूधचोरांची टोळी
रणजितसिंह पाटील त्यांचे सहकारी तसेच डी. व्ही. घाणेकर आणि आर. सी. शहा यांनी दुधाची चोरी आणि भेसळीचे प्रकरण उघडकीस आणून त्याची फिर्याद पोलिसांकडे दिल्याने संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. वेणूगोपाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेब कुटकोळे आणि संजय कडाकणे या आरोपींना ताब्यात घेवून एक टॅंकर, एक 407 टेम्पो, एक यामाहा मोटार सायकल आणि अन्य साहित्यासह सुमारे पंचवीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. किमान एक वर्षापासून हे दूधचोरी व भेसळीचे रॅकेट कार्यरत होते. दररोज सुमारे दीड ते दोन हजार लिटर गोकुळ दुधाची ते चोरी करून, त्यामध्ये भेसळ करून ते अन्य दूध संघ व खाजगी विक्री करत होते. साधारणत: त्यांनी एक वर्षामध्ये दीड कोटी रुपयांच्या गोकुळ दुधाची चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोकुळ दूध चोरी व भेसळीचे प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल घाणेकर आणि शहा, त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनीही त्यांचे अभिनंदन करून पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती संचालक मंडळास दिली होती. हे प्रकार घडू नयेत याची गोकुळचे संचालक दक्षता घेत असतात तथापि उघडकीस आलेल्या प्रकरणामध्ये गोकुळची कोणतीही यंत्रणा गुंतलेली असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
एकूणच या प्रकरणाची कसून चौकशी करून गोकुळ दुधाची चोरी करणारा "महाबोका' कोण याचा शोध घेवून त्याचे खरेखुरे नाव उघड केले पाहिजे. कर्नाटकातील पोलिसांचा नेहमीचा "व्यवहार' लक्षात घेता ते या प्रकरणाचा तपास किती गांभिर्याने करतील याबाबत साशंकता आहे. कारण एवढा मोठा गैरव्यवहार करणारी आसामी त्यांचे "खिसे' नोटांच्या बंडलांनी भरण्याची अधिक शक्यता आहे तसेच राजकीयदृष्ट्या "दबाव' तंत्र अवलंबण्याचा प्रकारही नाकारता येण्याजोगा नाही. त्याच बरोबर गोकुळशी संबंधित नेत्यांच्याकडे या प्रकरणाच्या "संशयाची सुई' झुकत असल्याची आणि गोकुळमधील यंत्रणा या प्रकरणात सामील असल्याशिवाय हे प्रकरण घडणेच शक्य नाही अशी जनमानसामध्ये जोरदार चर्चा आहे. कारण गोकुळच्या एका केंद्रावरून मुख्य शीतकरण केंद्रामध्ये दूध आल्यावर पुन्हा त्याच्या फॅटची तपासणी होते. मग दोन्ही ठिकाणच्या फॅटची भेसळ होवूनही आकडेवारी कशी एकच येत होती? की या विशिष्ट टॅंकरमधील दुधाच्या टॅंकरमधील फॅटच्या फेरमोजणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते असेही काही अनुत्तरित सवाल
जनतेमध्ये आहेत. या सर्वांचा शोध घेवून गोकुळने स्पष्टीकरण दिले पाहिजे अशी लोकभावना आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: