खरी देशप्रीती
ऐक्य समूह
Sunday, March 07, 2010 AT 02:23 AM (IST)
सुलेमानच्या देशापेक्षा माझा देश मला अधिक आवडतो. संबुल किंवा रेहापेक्षा (सुवासिक वनस्पती) माझ्या देशातील काटाच अधिक चांगला आहे, असे म्हणून स्वत: काटा व्हायचे आणि आपल्या देशाला देखील कंटकवन बनवायचे, ही खरी देशप्रीती नव्हे! साधारणपणे एकाच तऱ्हेची झाडे एकाच ठिकाणी गर्दी करून लावली, तर ती सर्व कमजोर होतात. त्यापैकी काही जरा दूरदूर लावा, म्हणजे ती मोठी आणि मजबूत अशी होतात. राष्ट्रांना हीच गोष्ट लागू पडते. काश्मीरविषयी म्हणतात, की "पृथ्वीवर वैकुंठ असेल तर ते हेच होय, नि:संशय हेच होय.'
परंतु काश्मीरी लोक आपले नंदनवन सोडून बाहेर जाणे हा गुन्हा समजतात, म्हणून ते कमजोर, दरिद्री आणि नादान असल्याबद्दल त्यांची ख्याती आहे. पण त्यांच्यापैकी जो काश्मीरी पंडित आपले पर्वतशिखरावरील भूवैकुंठ सोडून बाहेर निघाला, त्यालाच खरोखरी वैकुंठ प्राप्त झाले. तो जेथे जेथे गेला, तेथे तेथे इतर हिंदुस्थानी लोकांवर त्याने आपला पगडा बसवला आणि त्यांच्यामधील मोठमोठ्या जागा त्याने सुशोभित केल्या. जोपर्यंत जपानी लोकांनी आपणाला जपानमध्ये कोंडून घेतले होते, तोपर्यंत ते निर्बल आणि खालावलेले होते, जेव्हा ते परदेशी जाऊ लागले व त्यांना बाहेरची हवा लागली, तेव्हा ते धट्टेकट्टे बनले. युरोपमधील गरीब, दरिद्री, साधारण लोक जहाजात बसून अमेरिकेत जाऊन राहिले व आज ते सगळ्या जगात सामर्थ्यवान झाले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना स्वदेशी कोणी विचारित नव्हते, असे काही हिंदी लोक परदेशी जाताच तेथील सुधारलेल्या लोकांच्या उच्च उच्च दर्जांमध्ये मोडू लागले आणि त्यांनी तेथे मोठे नाव मिळविले आहे. पाणी वाहिले नाही तर त्याला घाण येते, खंजीर चालला नाही तर तो गंज खातो, फिरण्यानेच सूर्याला मोठेपणा आलेले आहे. चंद्रालाही त्यामुळेच महत्व आले आहे.